उघड्यावर कचरा जाळाल तर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार
By हणमंत गायकवाड | Published: December 29, 2023 07:37 PM2023-12-29T19:37:49+5:302023-12-29T19:38:04+5:30
लातूरात सहा महिन्यात २६ जणांवर कारवाई: २९ हजार रुपयांचा दंड वसूल
लातूर : लातूर शहरामध्ये दररोज घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत असले तरी उघड्यावर कचरा जळण्याच्या घटना दररोजच घडत आहेत. त्या विरोधात महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने मोहीम राबविली असून गेल्या सहा महिन्यात २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही पुन्हा कचरा जाळला तर आता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या स्वच्छता विभागाचे पथक कार्यरत झाले आहे.
महानगरपालिकेकडून दररोज घंटागाडीद्वारे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो. दोन्ही मिळून दीडशे ते साडेतीनशे टन कचरा संकलित होतो. तरीही कचरा जाळण्याच्या घटना घडत आहेत. विशेष करून खाजगी आस्थापनांच्या मालकांकडून कचरा जाळण्याच्या घटना घडतात. त्यावर आता महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाची नजर राहणार आहे.
गेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला, त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असे महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी सांगितले.
कचरा पेटविल्याने मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे...
ज्यांच्या आवारात कचरा पेटविण्यात आल्याचे आढळून आले, त्यांनाही यासाठी जबाबदार धरण्याची कायद्यात तरतूद आहे. असे असले तरी अशा स्वरूपाची कारवाई होताना दिसत नाही. आतापर्यंत कचरा पेटविल्याने कित्येक मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे आहेत. गोदामांना आग, उद्यानांना आग, भंगार साहित्याला आग लागण्याच्या घटना अशा निष्काळजीपणामुळे घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मनपाचा विचार आहे. प्रारंभी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
उघड्यावर कचरा पेटविणे कायद्यानुसार गुन्हा...
उघड्यावर कचरा पेटविणे हा पर्यावरण विषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसारही गुन्हा आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांना यावर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हवा प्रदूषित होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. कचरा कोणी पेटविला याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची आहे.
फौजदारी गुन्हे दाखल होणार
गेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला. त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. आता वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
-रमाकांत पिडगे, स्वच्छता विभाग प्रमुख, लातूर मनपा