नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द
By हरी मोकाशे | Published: June 21, 2023 07:31 PM2023-06-21T19:31:36+5:302023-06-21T19:32:23+5:30
कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.
लातूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे व खते पुरवठ्यासाठी कृषी विभागाने केलेल्या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात १४ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून दोन कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान कृषी सेवा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा व भाव फलक सहज दिसेल अशा ठिकाणी नसणे, साठा नोंदवही अद्ययावत न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील न लिहिणे, दुकानात वजन काटा न ठेवणे, विहित मुदतीत परवान्याचे नूतनीकरण करून न घेणे, लिंकिंग करणे आदी त्रुटी आढळून आल्या.
हे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १० बियाणे विक्री केंद्र आणि चार खत विक्री केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच, एका बियाणे विक्री केंद्राचा आणि एका खत विक्री केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.
औसा तालुक्यातील ५, लातूर- ३, अहमदपूर- ४, चाकूर- २, रेणापूर- १ आणि निलंगा तालुक्यातील १ अशा एकूण १६ कृषि निविष्ठा विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची नियमित तपासणी केली जात असून पेरणीच्या तोंडावर तपासणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान, अनियमितता आढळून आल्यास विक्री केंद्राचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
पावसापूर्वी खते खरेदी करा
खरीप हंगामाच्या कालावधीत दुकानात होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणारी खते पाऊस होण्यापूर्वी खरेदी करावीत. त्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होणार नाही, असे आवाहनही प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.
त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई
साठा फलक, भावफलक न लावणे, साठा नोंदवहीतील साठा व प्रत्यक्षात साठ्यात तफावत आढळणे, तसेच बियाणे व खताचा भावफलक, साठा नोंदवही अद्ययावत नसणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील न लिहिणे, खत अथवा बियाण्यांची लिंकिंग केल्यास विक्री केंद्राविरुद्ध कडक कारवाई करण्यात आहे.
- रक्षा शिंदे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.