शहरासह ग्रामीण भागात मास्क वापराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:18+5:302021-09-02T04:43:18+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या लाटेची अनेकांना झळ बसली आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या लाटेची अनेकांना झळ बसली आहे. आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. काहींवर जीवाभावाची माणसे गमविण्याची वेळ आली. दरम्यान, शासन व प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित कोविड लसीकरणावर भर दिला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.
कोविडबाधितांची संख्या घटल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात गर्दी होऊ लागली आहे. प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. समारंभांना गर्दी वाढू लागली आहे. येत्या आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सण-उत्सव आहेत. त्यामुळे प्रत्येकाने शासन नियमांचे पालन करणे गरजेचे ठरत आहे.
ग्राम समित्या नावालाच...
निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांकडून कोविडसंदर्भात दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी ग्राम समित्या पुन्हा कार्यरत होणे आवश्यक आहे. जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स राखणे गरजेचे आहे. गाव पातळीवरील प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.