रंगपंचमी काळात अवैध दारू, जुगारावर धाडसत्र, ५८ जणांवर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: March 13, 2023 06:40 PM2023-03-13T18:40:11+5:302023-03-13T18:40:25+5:30
यावेळी पोलिसांनी साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त एला आहे
लातूर : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारु, जुगारावर धाडी टाकण्यात आले आहेत. याबाबत विविध पाेलिस ठाण्यात तब्बल ५८ जणांविराेधात ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकूण ८ लाख ४५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सुरू आलेल्या अवैध दारूविक्री, जुगारावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्यासह जिल्ह्यातील डीवायएसपींच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या पाेलिस ठाण्यांच्या पथकाने छापा मारला. ही कारवाई ११ ते १२ मार्चदरम्यान करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत देशी-विदेशी दारूची अवैध विक्री, हातभट्टी निर्मिती करणाऱ्या अवैध व्यवसायाबाबत पथकांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकल्या.
४८ जणांवर अवैधदारूप्रकरणी गुन्हा...
जिल्ह्यात ४८ जणांविराेधात दारूबंदी कायद्याअंतर्गत ४७ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ३०४५९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत १० जणांविराेधात ३ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ४० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ११ आणि १२ मार्चराेजी केलेल्या कारवाईत अवैध दारू, जुगार कायद्यानुसार एकूण ५८ जणांविराेधात ५० गुन्हे दाखल केले आहे. १३६४ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, २६८ लिटर हातभट्टी, जुगाराचे साहित्य जप्त केले.