आजारपण, शिक्षणाने कर्मचारी बेजार; ६३४ जणांचा स्वेच्छानिवृत्तीला नकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:38+5:302021-01-13T04:48:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता ५० वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता ५० वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती याेजना जाहीर केली आहे. महाराष्ट्रात तब्बल लाखांच्या घरात कर्मचारी संख्या आहे. त्यातील २७ हजार कर्मचारी या याेजनेच्या कक्षात येतात. त्यामध्ये लातूर विभागातील एकूण पाच आगारांत ६७० कर्मचाऱ्यांचे ५० च्यावर वयाेमान आहे. मात्र, यातील तब्बल ६३४ कर्मचाऱ्यांनी या याेजनेला प्रतिसाद दिला नाही. अनेक कर्मचारी काैटुंबीक समस्या, शिक्षण, आई-वडिलांच्या आजारपणांनी बेजार आहे. अशा स्थितीत स्वेच्छानिवृत्ती घेणार कशी? असा सवाल उपस्थित केला आहे.
लातूर विभागातील एकूण पाच आगारातील केवळ ३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या याेजनेसाठी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये प्रशासकीय विभाग ३, यांत्रिकी शाखा २, वाहक ३ आणि चाल २९ अशा एकूण ३७ जणांचा समावेश आहे. महामंडळाकडून ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी ही याेजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अनेक कुटुंबांचा प्रपंच महामंडळाच्या नाेकरीवर अवलंबून आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न अद्यापही राहिलेले आहे तर अनेकांच्या घरात आई-बाबांचे आजारपण आहे. काही कर्मचारी आजही भाड्याच्याच घरात आपले वास्तव्य करतात. वय पन्नाशीच्या घरात पाेहोचले मात्र, काैटुंबिक प्रश्न अद्याप सुटले नाहीत. परिणामी, अनेकजण बेजार झाले आहेत.
स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील एकूण पाच आगारांत ३ हजार ५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्यातील ५० वर्ष ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ६७० च्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षाला ३ महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. शिवाय, जमा असलेला फंड आणि इतर सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, या याेजनेच्या प्रस्तावाला एकूण ६७० पैकी तब्बल ६३४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे.