१८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा; वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

By संदीप शिंदे | Published: April 12, 2023 02:41 PM2023-04-12T14:41:02+5:302023-04-12T14:43:45+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Image of Babasaheb Ambedkar made from 18 thousand Notebooks; Recorded in World Record of India | १८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा; वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

१८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा; वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

googlenewsNext

लातूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर  ११ हजार चौरस फूट जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजे वह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ही चित्राकृती  साकारताना १८ हजार वह्यांचा वापर करण्यात आला आहे. ११ हजार चौरस फूट जागेवर नोटबुक्सने साकारलेली देशातील पहिलीच चित्राकृती आहे. या कलाकृतीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने देखील घेतली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभूतपूर्व पद्धतीने अभिवादन करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. आर्टिस्ट चेतन राऊत आणि इतर १८ कलाकारांनी तीन दिवसात ही कलाकृती साकारली. ११ हजार चौरस फुट जागेवर  साकारण्यात आलेल्या या चित्रकृतीचे उदघाटन अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पाटील कव्हेकर ,शंकर शृंगारे, रागिणी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ११, १२ आणि १३ एप्रिल रोजी हे चित्र लातूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मुख्य संपादक पवन  सोलंकी यांनी या चित्राची विक्रमी नोंद झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

गेल्या वर्षी खासदार सुधाकर शृंगारे यांनी ७२ फूट उंचीची  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती उभारली होती . हा उपक्रम देखील आगळा-वेगळा ठरला होता. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री सेवालाल महाराज जयंती , रंगपंचमी, रामनवमी ,  असे अनेक उत्सव नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविले गेले आहेत.  हे चित्र पूर्ण करण्यासाठी आयोजकांच्या वतीने स्टारडस्ट  ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत. या चित्राकृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे.

वह्यांतून साकारलेली पहिलीच कलाकृती
वह्यांच्या माध्यमातून मोझ्याक पद्धतीने साकारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील हे पहिलेच चित्र आहे. ११ हजार चौरस फूट जागेवर रंगीत नोटबुक्स वापरून हे चित्र साकारण्यात आले आहे. हे चित्र पाहता यावे, चित्रासोबत सेल्फी घेता यावी यासाठी रॅम्पही या ठिकाणी उभारण्यात आला आहे. एका वेळी दहा लोक सेल्फी घेऊ शकतील असा हा रॅम्प आहे. मंगळवारपासून नागरिकांना पाहण्यासाठी ही कलाकृती खुली करण्यात आली आहे.

वह्या गरजू विद्यार्थ्यांना करणार वितरीत
या चित्राला चारही बाजूने कंपाउंड करून सुरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय नागरिकांना हे चित्र स्पष्ट दिसावे यासाठी एलईडी वॉल देखील लावण्यात आले आहे. संध्याकाळी लाईट्सच्या इफेक्टमध्ये हे चित्र आणखीनच लक्षवेधी दिसते आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी  या चित्राला पाहण्यासाठी यावे , असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री तोफांची सलामी देऊन हे चित्र काढण्यात येईल. त्यानंतर या वह्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू मुलांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत.

Web Title: Image of Babasaheb Ambedkar made from 18 thousand Notebooks; Recorded in World Record of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.