पशुपालकांसाठी महत्वाचे; अनुदान मिळवायचेयं, मग काढा पशुधनाचे आधारकार्ड!
By हरी मोकाशे | Published: January 8, 2024 06:07 PM2024-01-08T18:07:53+5:302024-01-08T18:08:18+5:30
जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून ऑनलाईन नोंदणी सुरु
लातूर : गायीच्या दुधाला शासनाकडून देण्यात येणारे अनुदान मिळविण्यासाठी अथवा हरवलेले आपले पशुधन ओळखण्यासाठी जनावरांचे आधारकार्ड (टॅग) काढणे महत्त्वाचे आहे. तसेच त्याची ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. जर टॅगिंग व ऑनलाईन नोंदणी न केल्यास पशुपालकांना सुविधा लाभ मिळणार नाही.
गायीच्या दुधाला शासनाच्या वतीने ५ रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यासाठी दुधाळ गाईंचे टॅगिंग आणि ऑनलाईन नोंदणी महत्त्वाची आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढीबरोबर पशुधन विमा कार्यक्रमाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.
भारत पशुधन ॲपवर माहिती...
दुभत्या जनावरांचे टॅगिंग झाल्यावर भारत पशुधन ॲपवर शेतकऱ्यांनी पशुधनाची जात, वय, दैनंदिन व एकूण दूध उत्पादनाची माहिती भरायची आहे. ती दूध केंद्रात संकलित केली जाईल. तेथून ती खाजगी व सहकारी दूध संघाकडे जाईल. माहिती व प्रत्यक्षातील दूध संकलनात तफावत आढळल्यास भेसळ शोधणे अथवा अनुदान लाटण्यासाठी अधिकचे दूध दाखविता येणे अवघड होणार आहे. या टॅगिंगमुळे राज्यातील दूध संकलनाची एकूण माहिती सरकारकडे जमा होणार आहे.
जिल्ह्यात ५ लाख १४ हजार मोठी जनावरे...
जिल्ह्यात एकूण गायी- म्हशी ५ लाख १४ हजार ६४५ आहेत. त्यात गायींची संख्या १ लाख ४२ हजार ८८१ इतकी आहे. शासनाकडून गायीच्या दूधाला अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात दुधाळ गाईंबरोबर अन्य जनावरांचे टॅगिंग आणि ऑनलाईन नोंदणीची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.
दोन आठवडे मोहीम...
जिल्ह्यातील सर्व पशुधनाचे टॅगिंग व ऑनलाईन माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे. पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लवकरात नोंदणी करावी. त्याचा पशुपालकांना लाभ होणार आहे.
- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.