नेपाळच्या आयात टोमॅटोचा स्थानिक उत्पादकांना फटका, दर निम्म्यावर

By आशपाक पठाण | Published: August 14, 2023 05:20 PM2023-08-14T17:20:44+5:302023-08-14T17:21:34+5:30

दोन महिन्यांपासून टोमॅटोमच्या दरात अचानक वाढ झाली. ५ रूपये किलोचे टोमॅटो आठवडाभरात बघता बघता १६० रूपये किलोंवर पोहचले.

Imported tomatoes from Nepal hit local producers | नेपाळच्या आयात टोमॅटोचा स्थानिक उत्पादकांना फटका, दर निम्म्यावर

नेपाळच्या आयात टोमॅटोचा स्थानिक उत्पादकांना फटका, दर निम्म्यावर

googlenewsNext

लातूर : सोन्याचा भाव आलेले टोमॅटो दोन महिन्यातच कोसळले असून लातूरच्या बाजारात ३० ते ६० रूपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयात केल्याने स्थानिक बाजारात दर कोसळले आहेत, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून शासनाच्या धोरणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केला आहे.

दोन महिन्यांपासून टोमॅटोमच्या दरात अचानक वाढ झाली. ५ रूपये किलोचे टोमॅटो आठवडाभरात बघता बघता १६० रूपये किलोंवर पोहचले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो होते, अशा शेतकऱ्यांना सोन्याचा भाव मिळाला. किरकोळ बाजारातही २० किलोचे कॅरेट २ हजार रूपये किलोप्रमाणे विक्री झाले. त्यामुळे अनेकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाले. हॉटेल, मेसमध्येही टोमॅटोला पर्याय म्हणून चिंचाचा वापर करण्यात आला. मागील आठवडाभरात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गंजगोलाई, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका, रयतू बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ३० ते ६० रूपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते शब्बीर शेख यांनी सांगितले.

आणखी दर घसरण्याची भीती...

टोमॅटोची आवक वाढली असून ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. मागच्या काही दिवसात किरकाेळ विक्रीही २०० रूपयांपर्यंत प्रतिकिलो गेली होती. सध्या चांगले टोमॅटो ५० रूपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत. पुढील आठवड्यात आणखी दर कमी होण्याची भिती आहे, दरवाढ झाल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. दर कमी झाल्याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे.

सरकारचे धोरण शेतकरीविरोधी : सत्तार पटेल

सोयाबीन परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती केली. सुरुवातीस चांगला भाव मिळाला नाही तरीपण आज ना उद्या भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या बागा जतन केल्या. ज्यावेळेस शंभर रुपयांवर दर टोमॅटोला मिळू लागला त्यावेळेस सरकारचे डोके फिरले आणि थेट नेपाळ वरून टोमॅटो आयातीचा निर्णय झाला. तेथील टोमॅटो बाजारात येताच ५० टक्के दर घटले. ज्या वेळेला बाजारामध्ये टोमॅटो दोन रुपये किलो प्रमाणे विकले जात होते त्यावेळेला सरकार बघ्याची भूमिका घेत होते. सरकारने कसलाही हस्तक्षेप त्या वेळेला केला नाही किंवा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांना धीर देण्याचे काम सुद्धा सरकारने केले नाही. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना मारक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध...

केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयात केले. त्यामुळे बाजारात टोमॅटोचे दर पडले. दहा वर्षातून पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एवढा चांगला भाव मिळाला. दर कमी शासन मदतीसाठी पुढे येत नाही. शेतकरी फायद्यात आला की हस्तक्षेप का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. टोमॅटो आयातीचा निर्णय निषेधार्ह असल्याचे जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, राजेंद्र मोरे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, जयराम पाटील आदींनी सांगितले

 

Web Title: Imported tomatoes from Nepal hit local producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर