सोयाबीनची आवक घटली; दर घसरले, खाद्यतेलास मागणीही कमी
By हरी मोकाशे | Published: December 23, 2023 07:26 PM2023-12-23T19:26:23+5:302023-12-23T19:27:11+5:30
पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन डीओसीची मागणी घटल्याने आणि देशात खाद्यतेलाची मागणी उतरल्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. सध्या बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली असतानाही दरात घसरण झाली आहे. शनिवारी ४ हजार ७२० रुपये प्रति क्विंटल असा सर्वसाधारण भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
गत खरीपात जिल्ह्यात साडेचार लाखापेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या राशी करुन थेट बाजारपेठेत विक्री करण्यास सुुरुवात केली होती. सुरुवातीस दरात वाढ झाली नव्हती. मात्र दीपावलीच्या सणाच्या कालावधीत आवक वाढूनही दरात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावण्यास सुरुवात झाली. आगामी काळात आणखीन दर वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली.
सण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण होण्यास सुुरुवात झाली. ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेला दर आता ४ हजार ७२० रुपयांपर्यंत उतरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटलमागे जवळपास ५०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
कमाल दरामध्येही घट कायम...
दिनांक - आवक - कमाल - किमान - सर्वसाधारण
१५ डिसेंबर - १३८९३ - ५०११ - ४६६४ - ४८५०
१६ रोजी - ९८३० - ४९६० - ४५५१ - ४८००
१८ रोजी - १३२७१ - ४९५१ - ४६०० - ४८००
२० रोजी - १२२२४ - ४९०० - ४५०० - ४७८०
२१ रोजी - ७५७५ - ४८५० - ४५०० - ४७५०
२२ रोजी - ८३१५ - ४७८५ - ४६४३ - ४७२०
२३ रोजी - ७९७७ - ४८०० - ४५२१ - ४७२०
आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीला मागणी कमी...
सोयाबीनचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात. यंदा ब्राझिलमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र, अर्जेंटिनामध्ये अधिक उत्पादन झाले आहे. परिणामी, विदेशात डीओसीचे भाव उतरले आहेत. त्यामुळे देशातील डीओसीची निर्यात होत नाही. तसेच देशात खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव उतरले आहेत.
- ललितभाई शहा, माजी सभापती, बाजार समिती.