लातूरच्या न्यू काझी मोहल्ला परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा; कारणांचा मनपाला शोध लागेना
By हणमंत गायकवाड | Published: January 8, 2024 06:26 PM2024-01-08T18:26:56+5:302024-01-08T18:27:21+5:30
नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
लातूर: शहरातील न्यू काझी मोहल्ला परिसरातील रुखय्या बेगम हायस्कूल रोड परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही की अशुद्ध पाणीपुरवठा कशामुळे होत आहे, याबाबतचे कारण शोधले जात नाही. नागरिकांना मात्र अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन अभियंता तसेच विद्यमान अभियंतांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिलेले आहे. दरम्यान, उपायुक्त मयुरा शेंद्रेकर यांची या भागातील नागरिकांनी भेट घेऊन अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे गाऱ्हाणे मांडले. याबाबत उपायुक्त शेंद्रेकर यांनी या भागातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बोलून तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, त्यांनी त्यांच्या दालनात पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांची बैठकही बोलवली आहे.
नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा.....
पाणी सोडणारे लाइनमन, जलकुंभ प्रमुख, शाखा अभियंता तसेच पाणीपुरवठा अभियंतांकडे निवेदनाद्वारे समस्या सोडविण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. आठ दिवसांमध्ये शुद्ध पाणी नळाला द्यावे अन्यथा मनपा आयुक्त, पाणीपुरवठा अभियंता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी अर्बन सेल व स्थानिक कलीम अ.रहेमान उस्ताद यांच्या वतीने मनपा प्रशासनाला दिला आहे.
नागरिकांच्या वतीने उपायुक्तांना निवेदन.....
निवेदनावर कलीम अ. रहेमान उस्ताद, जाकीर तांबोळी, डी. उमाकांत, शेख वसीम अक्रम खय्युम, इरफान रशीद पठाण, महेबुब खान, सफीउल्ला खान, शेख रसुलसाब, शेख बाबूसाब, शेख इब्राहिम नजीरमिया, शेख रोशन, शेख रफीक, शेख फारुख, अब्दुल सत्तार, शेख इमरोज, शेख मिनहाज, इरफान रज्जाक, राज मणियार यांच्यासह अनेक महिलांच्या व नागरिकांच्या सह्या आहेत.
समस्या असेल तर तत्काळ उपाययोजना
सगळीकडे शुद्ध पाणीपुरवठा आहे. न्यू काझी मोहल्ला परिसरातही शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. तरीही काही समस्या असतील तर त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- विजयकुमार चव्हाण कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, लातूर मनपा