उदगीरजवळ दोन गटाच्या हाणामारीत पिस्तुलने गोळीबार, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल
By संदीप शिंदे | Published: August 1, 2024 04:23 PM2024-08-01T16:23:05+5:302024-08-01T16:24:15+5:30
एकाने पिस्तुलने गोळीबार केल्याचा आरोप असून, दुसऱ्या गटाकडून दारू पिण्यासाठी पैसे द्या म्हणून खंडणी मागितल्याचा आरोप
उदगीर : शहराजवळ जकनाळ पाटी येथे एका वेअर हाऊससमोर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली. एकाने पिस्तुलने गोळीबार केल्याचा आरोप असून, दुसऱ्या गटाकडून दारू पिण्यासाठी पैसे द्या म्हणून खंडणी मागितल्याची तक्रार दिल्याने परस्पराविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी बालाजी अनिल चिद्रेवार (वय ३७ रा. आनंदनगर, उदगीर) यास लाला उर्फ अकबर पठाण, फिरोज व इतर दोन अशा चौघांनी बुधवारी सायंकाळी जकनाळ पाटी येथील एका वेअर हाऊसमध्ये येऊन मला दारू पिण्यासाठी पैसे दिले तर ठीक आहे नसेल तर तुला खतम करतो, अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत खंडणी मागितल्याची तक्रार दिल्यावरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायिक संहीता २०२३ कलम ३०८(२), ३५१(२), (३), ११५(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अकबर शेरदिलखाँन पठाण (वय ३० रा. अलीनगर, उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालाजी चिद्रेवार, अनिल चिद्रेवार व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी संगणमत करून बुधवारी सायंकाळी एका वेअर हाऊसच्या समोर ट्रक थांबलेले आहेत तू विचारणार कोण? याचा राग मनात धरून फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. अनिल चिद्रेवार यांनी त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूलने फिर्यादीस कानाजवळ गोळी मारून गंभीर जखमी केल्याच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२), (३) नुसार गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम करीत आहेत.