औसा तालुक्यात बालकल्याण समिती, पोलिसांनी रोखला बालविवाह
By संदीप शिंदे | Published: May 15, 2023 08:05 PM2023-05-15T20:05:11+5:302023-05-15T20:05:27+5:30
लामजना पाटी येथे लातुर-गुलबर्गा रोडवरील एका मंगल कार्यालयात बालविवाह आजोजित करण्यात आला होता
किल्लारी : औसा तालुक्यातील लामजना पाटी येथील एका मंगल कार्यालयात सोमवारी रिती रिवाजाप्रमाणे होणारा बालविवाह रोखण्यात किल्लारी पोलीस व लामजना येथील बालकल्याण समितीला यश आले आहे.
लामजना पाटी येथे लातुर-गुलबर्गा रोडवरील एका मंगल कार्यालयात औसा तालुक्यातील मुलासोबत धाराशिव जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह होणार असल्याची माहिती किल्लारी पोलीस ठाण्याचे बीट जमादार सचिन उस्तूर्गे व बालकल्याण समितीला मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब लिंगे यांनी सरपंच खंडेराव फुलारी, ग्रामविकास अधिकारी आर.आर. शिंदे, चाईल्ड लाईनचे समन्वयक बापु सुर्यवंशी यांनी मंगल कार्यालयात पालकांची भेट घेत त्यांना कायद्याविषयी माहिती सांगितली.
कायद्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेविषयी माहिती दिली. त्यानुसार पालकांचे मनपरिवर्तन झाल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पुर्ण झाल्यावर लग्न करु, अशी हमी देत विवाह थांबविला असल्याचे पोलिस व बालकल्याण समितीने सांगितले.