अहमदपूर, चाकुरात अवैध मद्यनिर्मिती; छापासत्रात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 05:54 PM2022-04-06T17:54:07+5:302022-04-06T17:56:10+5:30
लातूर, उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाची कारवाई
लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी छापा टाकला असून, यावेळी बनावट मद्यनिर्मितीसाठी लागणारे साहित्य, रिकाम्या बाॅटल आणि इतर साहित्य असा ३५ लाख १४ हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार दुपारपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत करण्यात आली. याबाबत अहमदपूर, चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चाकूर येथील सिद्धार्थनगरात आणि अहमदपूर येथील माळेवाडी येथे मद्यनिर्मितीसाठी लागणारे अवैध साहित्य असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकांनी अहमदपूर आणि चाकूर येथील घटनास्थळाची दाेन दिवस पाहणी केली. मंगळवारी दुपारी अचानकपणे एकाचवेळी लातूर आणि उदगीर येथील पथकाने छापा मारला. यावेळी बनावट मद्यनिर्मितीसाठी बाटली, बूच, लेबर आणि बाॅक्स असा एकूण ३५ लाख १४ हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत चाकूर आणि अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अधीक्षक गणेश बारगजे, निरीक्षक आर. एम. चाटे, निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक विजय राठाेड, देवदत्त पाचपाेळे, एल. बी. माेटेकर, अमाेल शिंदे, सहायक दुयम निरीक्षक अनंत कारभारी, गणेश गाेले, जवान सुरेश काळे, ज्याेतीराम पवार, श्रीकांत एस. साळुंके, अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, के. बी. गाेसावी, वाहनचालक एकनाथ फडणीस, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली.
माेजदादीसाठी लागले १८ तास...
अहमदपूर आणि चाकूर येथील धाडसत्रात बनावट मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची माेजदाद करण्यासाठी पथकाला तब्बल १८ तासांपेक्षा अधिक वेळ लागला. मंगळवारी दुपारी सुरू झालेली मोजदाद बुधवारी पहाटेच्या सुमारास पूर्ण झाली. स्पिरीट आणि मशीन वगळता इतर साहित्य पथकाच्या हाती लागले.
- गणेश बारगजे, अधीक्षक, लातूर