नऊ वर्षांपासून अवसायनात; लातूर जिल्ह्यातील ५५३ सहकारी दूध संस्थांची नोंदणी होणार रद्द!
By हरी मोकाशे | Published: October 14, 2023 02:09 PM2023-10-14T14:09:49+5:302023-10-14T14:48:08+5:30
शासनाच्या निर्देशानुसार अवसायानातील सहकारी दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
लातूर : जिल्ह्यात सध्या ६५९ सहकारी दूध संस्था असल्या तरी त्यांपैकी ५३३ संस्था गेल्या नऊ वर्षांपासून अवसायनात आहेत. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्या असून महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या सहकारी दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला आहे.
जिल्ह्यात सध्या गायवर्गीय पशुधन २ लाख ५५ हजार, तर म्हैसवर्गीय पशुधन २ लाख ५७ हजार आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येऊन प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्यातील दूध संकलनाबराेबरच योग्य भाव मिळावा म्हणून विविध सहकारी दूध संस्था आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ६५९ सहकारी दूध संस्था असल्या तरी त्यांपैकी ५३३ दूध संस्था सन २०१४-१५ पासून अवसायानात आहेत.
दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार अवसायानातील सहकारी दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात सहकारी संस्था (दूध) सहायक निबंधक एम. एस. लटपटे यांनी या संस्थांना नोटिसा बजावून ३० दिवसांत म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. संस्थांनी आपले म्हणणे योग्य कारणे सांगून मुदतीत सादर न केल्यास रद्दच कार्यवाही होणार आहे.
दोन टप्प्यांत बजावल्या नोटिसा
सन २०१४-१५ पासून अवसायनात असलेल्यांपैकी १८० सहकारी दूध संस्थांना २७ सप्टेंबर रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. तद्नंतर ३७३ संस्थांना १० ऑक्टोबर रोजी नाेटीस बजावण्यात आली आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रत्येकी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. आता म्हणणे काय येणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागून आहे.
५३ कुक्कुट, वराहपालन संस्थांवरही कार्यवाही
जिल्ह्यात ५३ वराह व कुक्कुटपालन सहकारी संस्थाही अवसायनात आहेत. त्यामुळे त्यांचीही नोंदणी रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यांनाही एक महिन्याची मुदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
आक्षेप सादर करण्याकरिता महिनाभराची मुदत
सन २०१४-१५ पासून जिल्ह्यातील एकूण ५३३ सहकारी दूध संस्था आणि ५३ सहकारी वराह व कुक्कुटपालन संस्था अवसायनात आहेत. शासनाच्या निर्देशानुसार त्यांची नोंदणी रद्द करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. आक्षेप सादर करण्याकरिता महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत आक्षेप आल्यास सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- एम. एस. लटपटे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दूध).
निलंगा तालुक्यात सर्वाधिक सहकारी दूधसंस्था
तालुका - संस्था संख्या
लातूर - ८९
औसा - ९३
उदगीर - ७३
निलंगा - ११७
चाकूर - २५
जळकोट - १०
रेणापूर - ४४
अहमदपूर - ५४
देवणी - ३०
शिरूर अनं. - १९
एकूण - ५५३