लातूरात ५६७ बियाणे, खत, कीटकनाशक नमुन्यांची तपासणी; ५५ अप्रमाणित!

By हरी मोकाशे | Published: January 17, 2024 05:36 PM2024-01-17T17:36:49+5:302024-01-17T17:37:33+5:30

लातूरात कृषी सेवा केंद्रांची पाहणी : ३५ दुकानांचे परवाने तात्पुरते निलंबित

In Latur 567 Testing of seed, fertilizer, pesticide samples; 55 unproven! | लातूरात ५६७ बियाणे, खत, कीटकनाशक नमुन्यांची तपासणी; ५५ अप्रमाणित!

लातूरात ५६७ बियाणे, खत, कीटकनाशक नमुन्यांची तपासणी; ५५ अप्रमाणित!

लातूर : बी- बियाणे, खत, कीटकनाशके चांगल्या दर्जाची मिळावीत, शेतकऱ्यांची कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने ९ महिन्यांमध्ये कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. दरम्यान, संशयास्पद असलेल्या बियाणे, खतांचे ५६७ नमुने घेण्यात आले. त्याची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ५५ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम असले तरी खरिपावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. जिल्ह्यात खरिपाचे जवळपास ६ लाख हेक्टर, तर रबीचे सरासरी साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र आहे. दरम्यान, प्रत्येक शेतकऱ्यास दर्जेदार बी-बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत. कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये आणि त्याच्या हातचा हंगाम जाऊ नये म्हणून कृषी विभागाकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत संशयास्पद नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येते. त्याचा अहवाल अप्रमाणित आल्यानंतर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात बियाणे विक्रीसाठी ११७५ कृषी सेवा केंद्र...

जिल्ह्यात बियाणे विक्रीचे १ हजार १७५ परवाने आहेत; तसेच खत विक्रीचे १ हजार ९२ परवानाधारक आहेत. त्याचबरोबर कीटकनाशक विक्री परवानाधारकांची ९६० अशी संख्या आहे. दरम्यान, एप्रिल ते डिसेंबरअखेरपर्यंत ६७४ कृषी सेवा केंद्रांची जिल्हा, तालुकास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली आहे. त्रुटी आढळलेल्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

बियाणांचे १८ नमुने अप्रमाणित...

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत गुणवत्तेबद्दल शंका असलेल्या ३२१ बियाणांचे नमुने घेण्यात आले. त्याची परभणीच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. दरम्यान, १८ नमुन्यांचा अहवाल अप्रमाणित आला. त्यातील सहा नमुन्यांप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे; तसेच १० नमुन्यांप्रकरणी दुकानदारांना ताकीद देण्यात आली आहे. १६ बियाणे विक्रेत्यांचा परवाना ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आला होता.

१९ खत विक्रेत्यांवर कारवाई...

जिल्ह्यात १७४ खत नमुने घेण्यात आले. त्याची पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यात २६ अपात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यातील काहींची फेरचाचणी करण्यात येणार आहे. १९ खत विक्रेत्यांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, कीटकनाशकांचे ७२ नमुने घेण्यात आले होते. ते सर्व प्रमाणित असल्याचा प्रयोगशाळेकडून अहवाल आला आहे.
संशयास्पद नमुन्यांची तत्काळ तपासणी...

बी-बियाणे, खते, कीटकनाशके गुणवत्तापूर्ण नसल्याचा संशय आल्यास तत्काळ नमुने घेण्यात येतात. शिवाय, कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार असल्यास तपासणी करून नमुने घेतले जातात. दुकानदारांनी दर्जेदार कृषी साहित्य विक्रीसाठी ठेवावे; तसेच परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे. शेतकऱ्यांची खरेदीवेळी पक्की पावती घ्यावी.
- संतोष लाळगे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक.

Web Title: In Latur 567 Testing of seed, fertilizer, pesticide samples; 55 unproven!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.