कॉपी करणाऱ्या तिघांवर कारवाई, मोबाईल आढळल्याने दोन शिक्षकांना नोटीसा
By संदीप शिंदे | Published: March 6, 2023 06:36 PM2023-03-06T18:36:27+5:302023-03-06T18:37:16+5:30
लातूरमध्ये कॉपी करणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली असून मोबाईल आढळल्याने दोन शिक्षकांना नोटीस देण्यात आली आहे.
लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्यापरीक्षा सुरु असून, सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. दरम्यान, देवणी तालुक्यातील वलांडी येथील व्यकंटेश विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्यावर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली. तर देवणी येथे परीक्षा केंद्रावर दोन शिक्षकांकडे मोबाईल आढळल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४९ केंद्रावर दहावीची परीक्षा सुरु असून, परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथकांची नियुक्त करण्यात आली आहे.
सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी देवणी येथील योगेश्वरी विद्यालयातील केंद्रावर भेट दिली असता तेथील दोन शिक्षकांकडे मोबाईल आढळून आला. याप्रकरणी त्या शिक्षकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाने यांनी देवणी तालुक्यातील वलांडी येथील व्यंकटेश विद्यालयाच्या केंद्रावर अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांना दोन मुली व एक मुलगा कॉपी करत असताना आढळून आला. त्यांनी तातडीने तीन विद्यार्थ्यांवर रेस्टीकेटची कारवाई केली.
भरारी पथकांच्या अचानक भेटी...
सोमवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. त्यामुळे दक्षता समितीच्या निर्देशानुसार २९ भरारी पथकांनी विविध केंद्रांना अचानक भेटी दिल्या. तर शिक्षणाधिकाऱ्यांनी देवणी तालुक्यात कारवाई केली. दरम्यान, उर्वरित परीक्षाही कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी परीक्षांवर भरारी पथकांची करडी नजर राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, वंदना फुटाणे यांनी सांगितले.