लातुरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणाऱ्या ७ पेट्रोलपंप, ३१ हॉटेल्सवर होणार कारवाई

By संदीप शिंदे | Published: March 16, 2023 08:03 PM2023-03-16T20:03:53+5:302023-03-16T20:04:11+5:30

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आदेश : प्रमुख मार्गांवरील हॉटेल्स, पेट्रोलपंपांची तपासणी

in Latur Action will be taken against 7 petrol pumps, 31 hotels without separate toilets for women | लातुरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणाऱ्या ७ पेट्रोलपंप, ३१ हॉटेल्सवर होणार कारवाई

लातुरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणाऱ्या ७ पेट्रोलपंप, ३१ हॉटेल्सवर होणार कारवाई

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील पेट्रोलपंप, हॉटेल्समध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तपासणीत ७ पेट्रोलपंप आणि ३१ हॉटेल्समध्ये स्वच्छतागृहे नसल्याचे आढळून आले. या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा महिला व बालविकास विभाग, परिवहन महामंडळ, उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे पदाधिकारी, पेट्रोलपंप चालक व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाच पथके नेमून प्रमुख मार्गांवरील पेट्रोलपंप, हॉटेल्समधील महिला स्वच्छतागृहांचा आढावा घेण्यात आला. या पथकांनी लातूर-बार्शी मार्ग, लातूर-अंबाजोगाई मार्ग, औसा मोड-निलंगा मार्ग व उमरगा मार्ग, लातूर-नांदेड मार्ग, लातूर-औसा-तुळजापूर मार्ग या मार्गांवरील ८१ हॉटेल्स आणि ५६ पेट्रोलपंपांची तपासणी केली. यापैकी ७ पेट्रोलपंप आणि ३१ हॉटेल्समध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याचे आढळले. तसेच काही ठिकाणीची स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याचे आढळून आले. त्यामुळे तातडीने दंडात्मक कारवाई करावी. तसेच या आस्थापनांना महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याबाबत आदेश द्यावेत. अस्वच्छ स्वच्छतागृहांना नोटीस देवून तातडीने स्वच्छता करण्यास सांगावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.

तपासणी मोहीम तहसीलदार शोभा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या पथकांमध्ये नायब तहसीलदार धनश्री स्वामी, परवीन पठाण, बाळासाहेब कांबळे, प्रवीण अळंदकर, बबिता आळंदे, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या सहसचिव संजीवनी सबनीस, अध्यक्ष डॉ. जयंती अंबेगावकर, सदस्य ऋता देशमुख, विद्या बोकील यांचा समावेश होता.

Web Title: in Latur Action will be taken against 7 petrol pumps, 31 hotels without separate toilets for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.