घरातच कुंटनखाणा चालविणारी आंटी लातूर पोलिसांच्या जाळ्यात !
By राजकुमार जोंधळे | Published: June 1, 2023 05:18 PM2023-06-01T17:18:51+5:302023-06-01T17:26:07+5:30
डमी ग्राहक पाठवून छापा; दोघा पीडितांची सुटका
लातूर : शहरात एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील घरात सुरु असलेल्या कुंटनखाण्यावर पोलिस पथकाने मध्यरात्री छापा मारला. यावेळी एका अंटीला अटक केली असून, दोघा पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरात एक महिला आपल्या राहत्या घरातच पैशाचे आमिष दाखवून बाहेरगावाहून महिलांना बोलावून घेत देहविक्रय व्यवसाय चालवीत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथकाने एक डमी ग्राहक पाठवून घरातच सुरु असलेल्या कुंटनखान्यावर अचानकपणे छापा मारला. यावेळी अँटीसह अन्य दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत झाडाझडती घेतला. यावेळी पीडित महिलांनी सांगितले, की पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या फायद्यासाठी देहविक्रय करुन घेतले जात आहे. त्यांनतर कुंटनखाना चालविणाऱ्या एका अँटीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३९२ / २०२३ कलम ३७० भादंविनुसार, तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५९, कलम ३,४,५ प्रमाणे गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक गोरख दिवे करीत आहेत.
या विशेष पथकाने घरावर मारला छापा...
ही कारवाई पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक शिरसाठ, मपोउपनि. श्यामल देशमुख, पोह.सदानंद योगी, मपोना सुधामती वंगे, लता गिरी,वाहन चालक बुड्डे यांच्या पथकाने केली.