कार लावण्याच्या कारणावरून हाणामारी; जखमी एकाचा रूग्णालयात मृत्यू
By आशपाक पठाण | Published: April 9, 2024 08:05 PM2024-04-09T20:05:52+5:302024-04-09T20:05:56+5:30
लातूर -उमरगा महामार्गावरील घटना
लातूर : लातूर-उमरगा महामार्गावर दत्ता पाटीजवळील एका हॉटेलसमोर कार लावण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. या घटनेत जखमी झालेल्या एकावर लातूरच्या खाजगी रूग्णायालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी जखमी स्वप्नील कदम याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी सायंकाळी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर-महामार्गावरील दत्ता पाटीजवळी हॉटेल श्रावणीसमोर ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवम राम कदम (वय ३०, रा. पारधेवाडी, ता. औसा) याने कार लावली असता यावेळी रणजित गुलाब बिराजदार, निवृत्ती आत्माराम बिराजदार, शुभम विष्णु गव्हाणे (सर्व रा. गोठेवाडी ता. औसा) यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केले. याप्रसंगी फिर्यादी शिवम कदम यांचा भाऊ स्वप्नील कदम, दशरथ शेषेराव कव्हे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता रणजित बिराजदार व निवृत्ती बिराजदार यांनी फिर्यादीच्या भावास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील दगड फेकून डोक्यात मारून जखमी केले. तसेच तुम्ही आमच्या नादाला लागलात तर एक एकाला खलास करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात तीन जणांवर कलम ३०७, ३३६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राजपूत करीत आहेत.
तीन जणांवर गुन्हा दाखल...
मारहाणीच्या घटनेत फिर्यादीचा भाऊ स्वप्नील कदम (रा. पारधेवाडी ता. औसा) याच्या डोक्याला मार लागल्याने लातूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.