लातुरातील काॅफी शाॅप, कॅफे चालकांना पोलिसांचा दणका; २४ जणांवर गुन्हे दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: July 12, 2023 07:53 PM2023-07-12T19:53:35+5:302023-07-12T20:05:49+5:30
लातुरातील काॅफी शाॅप, कॅफेंवर एकाचवेळी विविध पथकांकडून कारवाई...
लातूर : शहरातील विविध भागात असलेल्या काॅफी शाॅप आणि कॅफेवर पाेलिस पथकांनी छापे मारले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ कॅफेचालकांविराेधात विविध पाेलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने काॅफी शाॅप, कॅफेचालकांचे धाबे दणाणले आहे.
लातूरसह जिल्ह्यातील कॉफी शॉप आणि हॉटेलबाबत पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. त्यानुसार लातूर पोलिसांकडून वेळोवेळी कॉफी शॉप, हॉटेलवर छापे मारण्यात आले. मात्र, काॅफी चालकांवर निर्बंध नसल्याने, कॅफे आणि हॉटेलमध्ये निमयबाह्य गाेष्टींना चालना मिळेल, अशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून आले. परिणामी, कॉफी शॉप अन हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा वावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला होता. ठराविक कालावधीसाठी काॅफी शाॅप, कॅफे, हाॅटेलचालक शुल्क आकारून नकाे त्या बाबींना चालना देत असल्याचे समाेर आले. यातून कॉफी शॉप, हॉटेलमध्ये युवक-युवती अन अल्पवयीन मुले-मुली तासन्तास बसून चुकीचे वर्तन करत असल्याचे आढळून आले. अशा काॅफी शाॅप, कॅफे आणि हाॅटेलवर पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पाेलिस पथकांनी लातूरसह जिल्ह्यातील २४ काॅफी शाॅप, कॅफेवर एकाचवेळी छापे मारले. याबाबत विविध पाेलिस ठाण्यांत २४ काॅफी शाॅप, कॅफेचालकांविराेधात गुन्हे दाखल केले आहेत.
एकाचवेळी विविध पथकांकडून कारवाई...
पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, दामिनी पथकातील अधिकारी, अंमलदारांनी एकाचवेळी विशेष तपासणी मोहीम राबविली.
काॅफी शाॅपचालकांना पाेलिस पथकाचा दणका...
कॉफी शॉप, कॅफेचालकांना पाेलिसांनी दणका दिला असून, २४ जणांविराेधात कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवाजीनगर ठाण्यात १५ गुन्हे, एमआयडीसी ठाण्यात २, गांधी चौक ठाण्यात २, दामिनी पथकाकडून २, अहमदपूर ठाण्यात २ आणि उदगीर शहर ठाण्यात १ गुन्हा दाखल झाला आहे.