लातूर जिल्ह्यात ५६ केंद्रावर २६ हजार विद्यार्थी देणार नीट परीक्षा
By संदीप शिंदे | Published: May 6, 2023 01:31 PM2023-05-06T13:31:26+5:302023-05-06T13:31:46+5:30
ग्रामीण भागात तीन तर शहरात ५३ केंद्राची निर्मिती
लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्वपुर्ण समजली जाणारी नीट परीक्षा रविवारी ५६ परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील २५ हजार ८०० विद्यार्थी सामोरे जाणार असून, ग्रामीण भागात तीन तर शहरात ५३ परीक्षा केंद्र आहेत. या सर्व केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार असून, दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षा होणार आहे.
मागील दोन वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रविवारी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. औसा, उदगीर, अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी सेंटर असून, लातूरातही ५३ केंद्र आहेत. सकाळी ११ वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार असून, १.३० वाजता प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच २ ते ५ या वेळेत परीक्षा होणार असून, दिव्यांग विद्यार्थ्यांना १ तास ५ मिनिटांचा अधिकचा वेळ मिळणार आहे. सर्व केंद्रावर बायोमेट्रीक हजेरी असून, एनटीएच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तयारी करण्यात आली आहे. यंदाही लातूर तालुक्यातील गंगापूर, आर्वी, बाभळगाव, पेठ तर औसा तालुक्यातील हासेगाव, अलमला तसेच उदगीर, अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. दरम्यान, परीक्षेपुर्वीच केंद्राबाबत विद्यार्थ्यांच्या असलेल्या अडचणी सोडविण्यात आल्या असल्याचे नीट परीक्षेेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य सचिदानंद जोशी यांनी सांगितले.
साडेतीन हजार विद्यार्थांची भर...
मागील वर्षी २२ हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २१ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साडेतीन हजार विद्यार्थी वाढले असून, २५ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. दरम्यान, यंदाही ग्रामीण भागात तीन केंद्र आल्याने पालकांना केंद्रस्थळी पोहोचण्यासाठी घरुन लवकर निघावे लागणार आहे.