लातूर जिल्ह्यात पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीत औसा तालुका आघाडीवर
By हरी मोकाशे | Published: April 8, 2024 06:02 PM2024-04-08T18:02:34+5:302024-04-08T18:02:46+5:30
जिल्हा परिषद : मार्चअखेरपर्यंत ९३.१० टक्के कर वसुली
लातूर : गावच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असला तरी काही आवश्यक मूलभूत सोयी- सुविधांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुली महत्त्वाची ठरते. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कर वसुलीवर विशेष लक्ष असते. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मिशन स्वाभिमान मोहिमेमुळे मार्चअखेरीस एकूण ५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची कर वसुली झाली आहे. ती ९३.१० टक्के आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळते. मात्र, काही नियम, अटी आणि तांत्रिक बाबींमुळे गावातील सर्व भागांचा अपेक्षित विकास साधणे कठीण होते. परिणामी, गावातील नागरिकांत नाराजी निर्माण होण्यास सुरुवात होते. काही वेळेस वादही उद्भवण्याची भीती असते. अशावेळी घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुली अत्यंत उपयुक्त ठरते. त्यातून गावकऱ्यांच्या मागणीनुसार सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची वसुली...
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टी व घरपट्टीपोटी ६२ कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांचा कर भरणा होणे अपेक्षित होते. मार्चअखेरपर्यंत पाणीपट्टीपोटी ३५ कोटी ७० लाख तर घरपट्टीपोटी २२ कोटी ५४ लाख ९४ हजारांचा कर वसुली झाली आहे. एकूण ५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची कर वसुली झाली आहे.
औसा तालुक्यात ११ कोटींची वसुली...
तालुका - कर वसुली
अहमदपूर - ७ कोटी ३३ लाख
औसा - ११ कोटी ५ लाख
चाकूर - ४ कोटी ७४ लाख
देवणी - २ कोटी ५० लाख
जळकोट - १ कोटी ८३ लाख
लातूर - ८ कोटी ९८ लाख
निलंगा - ९ कोटी ९२ लाख
रेणापूर - ३ कोटी ७४ लाख
शिरुर अनं. - १ कोटी ९० लाख
उदगीर - ६ कोटी २१ लाख
एकूण - ५८ कोटी २४ लाख
महिनाभरात ९ कोटींचा कर भरणा...
फेब्रुवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात ४८ कोटी ९० लाख १३ हजार रुपयांची कर वसुली झाली होती. आणखीन १३ कोटी ६६ लाख ११ हजारांची वसुली थकित राहिली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी मार्चमध्ये कर वसुली पंधरवडा राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या नियोजनाखाली गावोगावी पथके नियुक्ती करण्यात आले होते. त्यामुळे १५ दिवसांत जवळपास ९ कोटींची कर वसुली झाली आहे.