लातूर जिल्ह्यात आधी भुगर्भातून आवाज, २५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का
By संदीप शिंदे | Published: March 27, 2024 03:17 PM2024-03-27T15:17:13+5:302024-03-27T15:19:27+5:30
भूकंपमापक यंत्रात २.६ रिश्टर स्केलची नाेंद : लातूर तालुक्यातील गंगापूरजवळ केंद्रबिंदू
औराद शहाजानी : मागील आठवड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचा सौम्य धक्का लातूर जिल्ह्यातील काही भागात जाणवला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी ११:५० वाजता औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून आवाज आला असून, त्याची कोणतीही नोंद झाली नाही. मात्र, दुपारी १२:१५ वाजता झालेल्या भूर्गभातील आवाजाची औराद शहाजानी केंद्रावर २.६ रिश्टर स्केलची नोंद झाली असून, केंद्रबिंदू लातूर तालुक्यातील गंगापूर आणि पेठ या दोन गावांच्या अंतरादरम्यान आहे.
मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचा सौम्य धक्का लातूर शहरासह देवणी, उदगीर, निलंगा, औराद शहाजानी परिसरात जाणवले होते. दरम्यान, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरातील अनेक गावांमध्ये बुधवारी सकाळी ११:५० वाजता अचानक भूगर्भातून एक मोठा आवाज झाला. हा आवाज औराद शहाजानी शहरासह परिसरातील तगरखेडा, हलगरा, सावरी गावांमध्ये ऐकू आला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, या आवाजाची कोणतीही नाेंद भूकंपमापक केंद्रावर झाली नाही. तसेच बुधवारी १२:१५ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून, त्याची २.६ रिश्टर स्केलची नोंद झाली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू हा लातूर तालुक्यातील गंगापूर आणि पेठ या दोन गावांच्या अंतरादरम्यान असल्याचे लातूर भूकंपमापक केंद्राचे प्रमुख आर. ए. साेळुंके यांनी सांगितले.