लातूर जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदार वाढले, संक्षिप्त यादी प्रसिद्ध
By हणमंत गायकवाड | Published: January 23, 2024 05:26 PM2024-01-23T17:26:55+5:302024-01-23T17:27:33+5:30
९९ हजार १३९ मतदारांची नावे यादीतून वगळली
लातूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मतदारांची संक्षिप्त यादी प्रसिद्ध केली असून, गत निवडणुकांच्या तुलनेत १ लाख ७१ हजार २५९ मतदार वाढले आहेत. तर वेगवेगळ्या कारणांमुळे ९९ हजार १३९ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
सध्या जिल्ह्यात एकूण १९ लाख ४५ हजार ७७१ मतदार असून, त्यापैकी ९ लाख २० हजार ७३६ महिला तर १० लाख २४ हजार ९७५ पुरुष मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण करण्यात आले असून, १ जानेवारी २०२४ किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी करता येते. २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्याच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत नोंदणी करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३ लाख २० हजार ८८ मतदार आहेत. तर शहर मतदारसंघात ३ लाख ७२ हजार १५९, अहमदपूर ३ लाख ३४ हजार ९३६, उदगीर राखीव मतदारसंघात ३ लाख ८ हजार ७७९, निलंगा ३ लाख १९ हजार ५५८ आणि औसा विधानसभा मतदारसंघात २ लाख ९० हजार २५१ मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
जिल्ह्यात विधानसभानिहाय स्त्री-पुरुष मतदार
मतदारसंघ पुरुष स्त्री
लातूर ग्रामीण १६९६१४ १५०४७१
लातूर शहर १९३३४९ १७८७८४
अहमदपूर १७७१४२ १५७७९३
उदगीर राखीव १६१६०१ १४७१५८
निलंगा १६८६३९ १५०९१२
औसा १५४६३० १३५६१८
एकूण १०२४९७५ ९२०७३६
घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी...
मागील वर्षी २०२३ च्या अंतिम मतदारयादीमध्ये एकूण १९ लाख १४ हजार ५५८ इतकी मतदारसंख्या होती. त्यानंतर झालेल्या निरंतर प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणे याबाबी सुरू होत्या. २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत मयत, स्थलांतरीत, दुबार मतदार सोडून त्यांची वगळणी दुरुस्ती करण्यात आली.
मतदानाचा टक्का वाढविणार...
शहरी आणि ग्रामीण भागात गत निवडणुकीमध्ये ज्या केंद्रावर कमी मतदान झाले होते, त्या केंद्राची यादी तयार करून त्या केंद्रावर मतदार वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय, जिल्ह्यामध्ये जी संवेदनशील मतदार केंद्रे आहेत, त्यांचीही यादी निश्चित करण्यात आली असून, तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम लातूर जिल्ह्याला उपलब्ध झाल्या असून, त्यांची तपासणी करून त्या गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कडक पहाराही ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.