लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी
By हरी मोकाशे | Published: April 6, 2024 05:23 PM2024-04-06T17:23:06+5:302024-04-06T17:24:02+5:30
उन्हं अन् पाणी वापरामुळे मध्यम प्रकल्पातील साठ्यात घट
लातूर : वाढत्या उन्हामुळे पारा ४२ अं. से. वर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. परिणामी, बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. वाढते उन्हं आणि पाणी वापरामुळे दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह अन्य नद्या, नाले वाहिले नाहीत. परतीचाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यास डिसेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलसाठ्यातील बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. शिवाय, आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा वापर होत असल्याने दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. विशेष म्हणजे, मध्यम प्रकल्पातील साठ्यात दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.
सध्या केवळ ७.८८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक....
प्रकल्प - साठा टक्के
तावरजा - ००
व्हटी - ००
रेणापूर - ७.८०
तिरु - ००
देवर्जन - ९.८२
साकोळ - १४.१६
घरणी - १०.२७
मसलगा - २२.९५
एकूण - ७.८८
गेल्या वर्षी ५० दलघमी जलसाठा...
गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले होते. शिवाय, परतीचा पाऊस झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. गेल्या वर्षीच्या एप्रिलमधील पहिल्या आठवड्यात ८ मध्यम प्रकल्पांत ५०.७७५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा केवळ ९.६३१ दलघमी पाणी उपलब्ध आहे. विशेषत: तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत.
तारीख - प्रत्यक्षात उपयुक्त साठा...
२८ फेब्रुवारी - १४.०१४
६ मार्च - १३.१३५
१३ मार्च - १२.५०१
२० मार्च - ११.४५९
२७ मार्च - १०.५१७
३ एप्रिल - ९.६३१
लघु प्रकल्पांत १० टक्के पाणी...
जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. त्यातील पाण्याचा उपयोग हा सर्वाधिक पशुधनासाठी होतो. सध्या या तलावांमध्ये उपयुक्त जलसाठा ३१.५२३ दलघमी आहे. त्याची १०.०३ अशी टक्केवारी आहे.
मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणी...
निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात प्रत्यक्षात उपयुक्त साठा सर्वाधिक असून तो ३.१३१ दलघमी आहे. रेणापूर प्रकल्पात १.६०४, देवर्जनमध्ये १.०४९, साकोळ- १.५५०, घरणी मध्यम प्रकल्पात २.३०७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.