लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!
By हरी मोकाशे | Published: April 15, 2024 06:39 PM2024-04-15T18:39:14+5:302024-04-15T18:39:25+5:30
पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव
लातूर : चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सतत अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाचा पारा उतरला असला तरी पाणीटंचाईचे चटके वाढतच आहेत. सध्या जिल्ह्यातील ३४९ गावांच्या घशाला काेरड पडली आहे. ती कमी करण्यासाठी अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. टंचाईच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागत आहे. तोपर्यंत होरपळ सहन करावी लागत आहे.
गत पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, भूजल पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अं. से. पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडू लागले आहेत तर विहिरींनी तळ गाठला आहे. कुपनलिकाही उचक्या देऊ लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांवर पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.
निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...
तालुका - टंचाईग्रस्त गावे
लातूर - ३८
औसा - ४६
निलंगा - ८६
रेणापूर - ३४
अहमदपूर - ८२
चाकूर - २४
शिरुर अनं. - ०७
उदगीर - २०
देवणी - ०१
जळकोट - ११
अधिग्रहणाच्या पाण्यावर १६७ गावे...
जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील २० गावांचे ४२ प्रस्ताव प्रत्यक्ष पाहणीनंतर वगळण्यात आले आहेत. उर्वरितपैकी २४९ गावांचे ३१२ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी १३७ गावे आणि ३० वाड्यांचे अशा एकूण १६७ गावांचे १८३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
शिरुर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही...
जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ७ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने तेथून १२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे केवळ शिरुर अनंतपाळ तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले नाही. सर्वाधिक अधिग्रहणे अहमदपूर तालुक्यात सुरु असून ४८ अशी संख्या आहे.
२४ गावांची टँकरची मागणी...
जिल्ह्यातील २४ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात २१ गावे आणि तीन वाड्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. सध्या ८ गावांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे. आणखीन एक टँकर मंजूर आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा सुरु नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.