HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के

By संदीप शिंदे | Published: May 25, 2023 03:47 PM2023-05-25T15:47:33+5:302023-05-25T15:47:44+5:30

लातूर विभागातून ४८ हजार ८३३ मुले, तर ३९ हजार २१८ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या.

In Latur division this year too, girls are better than boys; Board result 90.37 percent | HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के

HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के

googlenewsNext

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून, लातूर विभागीय मंडळाचा ९०.३७ टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलीच निकालात सरस ठरल्या असून, मुलींचा ९४.१६, तर मुलांचा ८७.३२ टक्के निकाल लागला आहे.

लातूर विभागीय मंडळांतर्गत उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानुसार बारावी परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातून ३८ हजार २७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील ३३ हजार ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा ८८.५६ टक्के निकाल लागला आहे, तर लातूर जिल्ह्यातील ३४ हजार १४५ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार ६४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९२.६६ टक्के निकाल लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार ६३० पैकी १४ हजार २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा ८९.७५ टक्के निकाल लागला आहे. लातूर विभागातून ४८ हजार ८३३ मुले, तर ३९ हजार २१८ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. ४२ हजार ६४१ मुले, तर ३६ हजार ९३१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

विज्ञान शाखेचा ९६.४२ टक्के निकाल...
लातूर विभागातून विज्ञान शाखेच्या ४४ हजार २३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४२ हजार ६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाखेचा निकाल ९६.४२ टक्के लागला आहे. कला शाखेतून ३१०२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २५ हजार ४१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा ८१.९१ टक्के निकाल आहे. वाणिज्य शाखेतून ९०३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ८२४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वाणिज्यचा ९१.२४ टक्के निकाल लागला आहे, तर व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये ३५८५ पैकी ३१०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ८६.६३ टक्के निकाल लागला आहे.

विभागात लातूर जिल्हा सरस...
लातूर विभागीय मंडळाचा मागील वर्षी बारावी परीक्षेचा ९५.२५ टक्के निकाल लागला होता. यंदा मात्र ५ टक्क्यांची घट आहे. यावर्षी मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.३२ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.१६ टक्के आहे. विभागात लातूर जिल्हा अव्वल असून, द्वितीय उस्मानाबाद, तर तृतीय स्थानावर नांदेड जिल्हा आहे.

Web Title: In Latur division this year too, girls are better than boys; Board result 90.37 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.