लातूरात १२ दिवशीही आडत बंद; बाजार समितीच्या कारवाईकडे वेधले शेतकऱ्यांचे लक्ष

By हरी मोकाशे | Published: July 12, 2024 07:40 PM2024-07-12T19:40:18+5:302024-07-12T19:41:05+5:30

सातत्याने बैठका घेऊनही शेतमालाचा सौदा सुरु होत नसल्याने बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली.

In Latur even on 12 days Aadat market closed; The attention of the farmers was drawn to the action of the market committee | लातूरात १२ दिवशीही आडत बंद; बाजार समितीच्या कारवाईकडे वेधले शेतकऱ्यांचे लक्ष

लातूरात १२ दिवशीही आडत बंद; बाजार समितीच्या कारवाईकडे वेधले शेतकऱ्यांचे लक्ष

लातूर : आडत बाजार पूर्ववत सुरु करावा म्हणून बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावत २४ तासांची मुदत दिली. ही मुदत संपत आल्याने आता खरेदीदार काय निर्णय घेतात आणि बाजार समिती कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, १२ व्या दिवशीही आडत बाजार बंद होता.

पणन कायद्यानुसार शेतमालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी २४ तासांच्या आत आडत्यांना पैसे देणे अपेक्षित आहे. या कायद्याचे पालन करावे म्हणून बाजार समितीने पत्र काढले होते. तेव्हा खरेदीदारांनी पूर्वी बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश देण्यात येईल, असे सांगितले. त्यावरुन बाजार समितीचा आडत बाजार १ जुलैपासून बंद आहे. हा तिढा सोडविण्यासाठी बाजार समितीने आजपर्यंत आठ बैठका घेतल्या. त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन अडचण दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सातत्याने बैठका घेऊनही शेतमालाचा सौदा सुरु होत नसल्याने बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. जवळपास ६०० खरेदीदारांना नोटिसा बजावत २४ तासांत सौद्यात सहभागी होण्यासाठी मुदत दिली आहे. ही मुदत संपत आल्याने आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

योग्य ती कारवाई करु...
शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून सातत्याने आमचा पाठपुरावा सुरु आहे. आजपर्यंत आठवेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. तद्नंतर नोटिसा बजावल्या आहेत. खरेदीदार सौद्यात सहभागी न झाल्यास आता योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती

व्यवहार सुरु करावेत...
बाजार समितीतील व्यवहार १ जुलैपासून बंद असल्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे शेतमालाचा सौदा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे शाखा अध्यक्ष बालाजी जाधव यांनी बाजार समितीस दिले आहे. व्यवहार पूर्वपदावर न आणल्यास संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: In Latur even on 12 days Aadat market closed; The attention of the farmers was drawn to the action of the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.