पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा
By संदीप शिंदे | Published: December 26, 2022 04:42 PM2022-12-26T16:42:21+5:302022-12-26T16:42:51+5:30
उसाला पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन एकरकमी देण्याची मागणी
लातूर : जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून, खरिपात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अंतिम पैसेवारीही ४६ पैसे आली असून, विमा कंपनी संरक्षित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्यापोटी हेक्टरी ५४ हजार रुपयांची संरक्षित रक्कम द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
गळीत हंगाम २०२२-२ साठी उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये एकरकमी देण्यात यावी,सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करण्यात यावेत,२०२२ मधील अतिवृष्टीचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावे, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर शासनामार्फत शेतकऱ्याच्या उसातील साखर उतारा तपासण्यासाठी यंत्रणा उभारावी, साखर आयुक्तांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या वजनकाटा तपासणी समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव,धर्मराज पाटील, माणिक गायकवाड,उषाताई झिंगे,महारुद्र चौंडे,व्यंकट मुळके,काकासाहेब जाधव,बालाजी शिंदे,बबन चव्हाण, प्रकाश रोडगे,रामभाऊ नलावडे,दत्तू टिपे,अशोक दहीफळे, गोविंद बस्तापुरे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर करा...
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून,तिसरी यादी तात्काळ जाहीर करून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान तातडीने वर्ग करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.