लातुरात ५ दुचाकीसह एक जाळ्यात; पाच गुन्ह्यांचा झाला उलगडा
By राजकुमार जोंधळे | Published: January 9, 2023 07:37 PM2023-01-09T19:37:23+5:302023-01-09T19:37:36+5:30
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर : चाेरीतील दुचाकी खरेदी-विक्री करण्यासाठी लातुरात आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवीन रेणापूर नाका येथे अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. अधिक चाैकशीत लातूरसह हडपसर - पुणे येथे दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दुचाकी चाेरी आणि इतर गुन्ह्यांच्या तपासाचे आदेश दिले हाेते. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेत पाेलिस आराेपीच्या मागावर हाेते. चाेरीतील दुचाकी लातुरातील नवीन रेणापूर नाका, रेल्वे स्थानक परिसरात खरेदी-विक्री करण्यासाठी एक जण येत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तेथे सापळा लावला. यावेळी चोरीच्या दुचाकी खरेदी - विक्रीचा व्यवहार करण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात फिरणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेत अधिक चाैकशी केली असता, मुकेश वामन गायकवाड (वय २८, रा. हंचनाळ, ता. निलंगा) असे नाव त्याने सांगितले. पाेलिसांनी हिसका दाखवताच लातूर शहरासह इतर जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. त्या दुचाकी एकत्र लपवून ठेवून एकदाच विक्री केली जाते, असेही सांगितले. त्याच्याकडून पाेलिसांनी पाच दुचाकी (किंमत १ लाख ५० हजार) असा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर - पुणे जिल्ह्यात पाच गुन्हे दाखल...
लातूर जिल्ह्यात ४ गुन्हे आणि पुणे जिल्ह्यात १ गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. लातुरातील एमआयडीसी ठाण्यात तीन, गांधी चाैक पाेलिस ठाण्यात १ आणि हडपसर - पुणे ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, राजेश कंचे, जमीर शेख, नितीन कठारे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.