गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडली दारू; सहा जणांवर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: June 12, 2023 11:48 PM2023-06-12T23:48:43+5:302023-06-12T23:48:52+5:30
अवैध दारु विक्रीने अख्खे गाव झाले त्रस्त, भादा गावातील नागरिकांसह पोलिसांनी तेथे धाडी टाकल्या असून, पाेलिसांनी दारुचा साठा जप्त केला आहे.
औसा (जि. लातूर) : तालुक्यातील वडजी येथे अवैध देशी, विदेशीसह गावठी दारूची विक्री वाढली होती. त्यामुळे गावात तंट्यांचे प्रमाण वाढले असून, सोमवारी त्रस्त झालेल्या गावकऱ्यांच्या मदतीने भादा पोलिसांनी वेगवेगळ्या तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. यावेळी देशी-विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, भादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत औसा तालुक्यातील वडजी येथे माेठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारुची बिनदिक्कत विक्री हाेत असून, यामुळे त्रस्त झालेल्या महिलांसह नागरिकांनी भादा पाेलिस ठाण्यात एकत्र येत पोलिसांना निवेदन दिले. गावात सुरु असलेली दारु बंद करुन, गावात दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. वडजी येथे शिवाजी मुळे, प्रकाश साठे, चतुर्भुज माळी हे अवैधरित्या दारूविक्री करीत होते. भादा गावातील नागरिकांसह पोलिसांनी तेथे धाडी टाकल्या असून, पाेलिसांनी दारुचा साठा जप्त केला आहे. याबाबत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पाेलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी दिली.
या कारवाईसाठी पाेलिस, गावकऱ्यांनी घेतला पुढाकार...
वडजी गावात हाेणाऱ्या दारुचा बंदाेबस्त करण्यासाठी, दारु विक्रेत्यांवर धाडी टाकण्यासाठी त्रस्त झालेले नागरिक, महिला आणि भादा ठाण्याच्या पाेलिसांनी पुढाकार घेत ही कारवाई केली. यावेळी सरपंच महादेव गुरुशेट्टे, ग्रामपंचायत सदस्या दैवशाला माळी, गोविंद कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष रामप्रसाद दत्त, सचिन घुले, लखन माळी, धीरज मुळे, सायना माळी, जयश्री माळी, मैना चव्हाण, रुक्मिण कदम, पंकज माळी, अंगद माळी, निवास मुळे, नारायण नकाते यांच्या बिट अंमलदार डोलारे हे उपस्थित हाेते.