मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वेतन कपातीला दिला नकार; कॉन्स्टेबलचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र
By राजकुमार जोंधळे | Published: June 17, 2023 10:27 PM2023-06-17T22:27:43+5:302023-06-17T22:28:32+5:30
हे पत्र समोर आल्यानंतर कॉन्स्टेबल खांडेकर यांच्या समर्थनार्थ अनेक प्रतिक्रिया आले आहेत.
लातूर - नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जून मधील वेतनामधून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कपात करावे, असा शासन निर्णय नुकताच आला आहे. त्यास नकार देत लातुरातील पोलिस कॉन्स्टेबलने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे वेतन कपातीच्या नकार मागील आपली व्यथा मांडली आहे. पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याबाबत ९ जून रोजी परिपत्रक निघाले आहे. त्याचा संदर्भ देत लातुरातील स्थानिक गुन्हा शाखेतील कॉन्स्टेबल एस.एन. खांडेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे वेतनातून कपात करू नये, असे पत्र दिले आहे.
त्यात खांडेकर यांनी म्हटले आहे, ते नवीन पेन्शनधारक असून, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे भविष्य अडचणीचे असणार आहे. तसेच पोलिसांच्या अनियमित कामकाजांच्या वेळांमुळे आरोग्याच्या समस्याही अनंत आहेत. याशिवाय, पोलिसांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वेतन कमी असल्यामुळे ते स्वत: इतरांना मदत करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये.
दरम्यान, हे पत्र समोर आल्यानंतर कॉन्स्टेबल खांडेकर यांच्या समर्थनार्थ अनेक प्रतिक्रिया आले आहेत. शिवाय, नव्याने पोलिस सेवेत भरती झालेल्या अनेक तरूणांना हाच पवित्रा घेतल्याचे समोर येत आहे.