आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांचे कामबंद; खेड्यापाड्यातील रुग्णसेवा ठप्प
By हरी मोकाशे | Published: January 16, 2023 04:07 PM2023-01-16T16:07:20+5:302023-01-16T16:08:12+5:30
जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक आंदोलन
लातूर : शासन सेवेत कायम करावे तसेच गट ब चा दर्जा देण्यात यावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील उपकेंद्रातील आरोग्य सेवा ठप्प झाली.
आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड काळात उत्कृष्ट कार्य केले आहे. याशिवाय तेरा प्रकारच्या नियमित सेवा देतात. तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन ते पूर्ण करतात. विविध लसीकरणासह गरोदर मातांना सेवा, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची तपासणी करुन आरोग्य सेवा देतात. या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून आपल्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, शासन स्तरावर दखल घेतली गेली नसल्याने या डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलन करीत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला होता.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी गोडगे, सचिव डॉ. सविता भारती, कोषाध्यक्ष अजित पाटील, डॉ. किशाेर सालेवार, डॉ. चंद्रशेखर जाधव, डॉ. श्रध्दा डोंगरगावकर, डॉ. विष्णू गायकवाड, डॉ. योगिता मलकापुरे, डॉ. महेश चेंडकापुरे, डॉ. विष्णू पांचाळ आदींची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी...
वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस देण्यात यावा. निश्चित वेतन ९० टक्के व कामावर अधारित वेतन १० टक्के द्यावे. जिल्हाबाह्य व जिल्ह्याअंतर्गत विनंती बदलीचे धोरण तात्काळ राबवावे. २३ निर्देशांक पीआयबी फॉरमॅट रद्द करावा. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बढती द्यावी, प्रवास, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.
तान्हुल्या लेकरांसह डॉक्टर महिला आंदोलनात...
या आंदोलनात दोन- तीन महिला डॉक्टर आपल्या तान्हुल्या लेकरांसह सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात जिल्ह्यातील १६७ समुदाय आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली.