लातुरात विश्वविक्रमाची 'सृष्टी' अवतरली; सलग १२७ तासांच्या नृत्याची गिनीज बुकमध्ये नोंद
By संदीप शिंदे | Published: June 3, 2023 05:15 PM2023-06-03T17:15:56+5:302023-06-03T17:16:58+5:30
चार दिवस चेहऱ्यावर कसलाही थकवा न येता सृष्टी नृत्य करीत होती. पाचवा दिवस आणि रात्र तिच्यासाठी आव्हानात्मक होती. परंतू, शेवटच्या टप्प्यात देशभक्तीपर गीतांवर ती सक्षमपणे टिकून राहिली.
लातूर : शनिवारी दुपारी २ वाजता नृत्याविष्काराचे १२७ तास पूर्ण करीत सृष्टी जगताप हिने नेपाळच्या नावावरील रेकॉर्ड मोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताचे नाव कोरले. जिद्द आणि कठीण परिश्रमातून सहाव्या दिवशी तिच्या नृत्याने लातुरात जणू विश्वविक्रमाची सृष्टीच अवतरली.
चार दिवस चेहऱ्यावर कसलाही थकवा न येता सृष्टी नृत्य करीत होती. पाचवा दिवस आणि रात्र तिच्यासाठी आव्हानात्मक होती. परंतू, शेवटच्या टप्प्यात देशभक्तीपर गीतांवर ती सक्षमपणे टिकून राहिली. शेवटी गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी सृष्टीला प्रमाणपत्र देऊन विक्रम प्रस्थापित केल्याचे जाहीर केले.
नेपाळमधील वंदना नेपाल या तरुणीने १२६ तास नृत्य करुन विश्वविक्रम केला होता. ते आपल्या देशाकडे खेचून आणत सृष्टीने २९ मे रोजी सकाळी ७ वाजता दयानंद सभागृहात सुरु केलेले नृत्य ३ जुन रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ण केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी नृत्य विशारद असून, दहावीला तिने ९९ टक्के गुण मिळविले होते.
१४ महिन्यांची परीक्षा...
रेकॉर्डनंतर सृष्टी म्हणाली, १२६ तासांपेक्षा अधिक वेळ नृत्य करण्यासाठी तिने १४ महिन्यांपासून तयारी केली. आजोबा बबन माने, वडील सुधीर आणि संजीवनी जगताप-माने यांनी संतूलित आहार, योगनिद्रा व ध्यान आणि व्यायामाचा सराव करुन घेतला. मला युपीएससी करुन जिल्हाधिकारी व्हायचे आहे, असेही तिने सांगितले.
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी नियम...
सृष्टीला प्रत्येक तासामागे ५ मिनिटांची विश्रांती नियमात होती. परंतू तिने तीन तास सलग नृत्य करुन कधी दहा ते कधी १५ मिनिटे विश्रांती घेतली. रेकॉर्ड झाला त्यावेळी तिचे विश्रांतीचे दोन मिनिटे शिल्लक होते. ३० सेंकदांपेक्षा अधिक वेळ पायांची हालचाल न झाल्यास बाद केले जाते. त्याचे काटेकोर पालन केले. काही मिनिटांत योगनिद्रेद्वारे त्या-त्या वेळी विश्रांती घेतली.
आजोबांनी उचलून घेतले...
सृष्टी रेकॉर्ड ब्रेक केल्यावरही नृत्य करीत होती. १२७ तास झाले होते. मात्र, सृष्टीला १३१ तास नृत्य करण्याची इच्छा होती. सभागृहातील जल्लोष, गर्दी आणि घोषणांनी परिसर दुमदूमला होता. परंतू, वडील सुधीर, आई संजीवनी आणि आजोबा बबन माने यांनी तिला थांबण्याची विनंती केली. तरीही ती थांबली नसल्याने शेवटी आजोबांनी तिला उचलून घेतले. त्यावेळी सृष्टी, कुटुंबियांसह उपस्थितांना आनंदाश्रू आवरले नाहीत.