मानसिक आजारातून मुक्त मातेस ६ वर्षांनी आठवली मुलगी अन् घर; अखेर चिमुकलीची झाली भेट
By संदीप शिंदे | Published: May 27, 2023 08:14 PM2023-05-27T20:14:26+5:302023-05-27T20:14:48+5:30
चिमुकली २२ दिवसांची असताना आईस मानसिक आजार जडला, अखेर मातृछत्र सहा वर्षांनी भेटले
लातूर : मानसिक आजारामुळे घरापासून दुरावलेल्या एका महिलेला सहा वर्षांनंतर बरे झाल्यावर आपल्याला लहान मुलगी होती हे पहिल्यांदा आठवले. तिच्यातील मातृत्वाने आजारावर विजय मिळवित मुलगी, कुटुंबीय, घर-गावही ध्यानी आले. मुलगी २२ दिवसांची असताना बाहेर पडलेली आई सहा वर्षांनी कन्येसमोर आली अन् तिला मातृछत्र मिळाले.
जानेवारी २०२३ मध्ये लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातून सहायक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशनचे राहुल पाटील यांना संपर्क करून मानसिक आजारी स्थितीत असलेल्या महिलेची माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महिलेला बुलढाणा येथील अशोक काकडे यांच्या दिव्य सेवा प्रकल्पात पाठविले. तिथे तिच्यावर विनामूल्य उपचार झाले. ती बरी झाली. त्यानंतर तिने स्वत:चे नाव सुरेखा सांगितले. तिला लहान मुलगी असल्याचे आठवले. मूळची नांदेड येथील व सासर पंढरपूर असल्याचे तिने सांगितले. अशोक काकडे यांनी उपचारानंतर सुरेखा यांना घरी पोहोचविण्यासाठी लातूरच्या आरटीआर फाउंडेशनचे राहुल पाटील, आकाश गायकवाड, आसिफ पठाण, मुस्तफा सय्यद, गोपाल ओझा यांच्याशी संवाद साधला. तेथून कुटुंबीयांचा शोध घेऊन कार्यकर्त्यांनी महिलेला घरापर्यंत पोहोचविले.
आई म्हणत...घट्ट मिठी मारली...
२२ दिवसांची चिमुकली असताना आईचे घर सुटले. ती कुठे आहे, ती आता कशी दिसत असेल याची कसलीही कल्पना नाही. सहा वर्षांनंतर तिला कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबीयांनी जेव्हा सांगितले ही तुझी आई तेव्हा तिने आई म्हणत...घट्ट मिठी मारली. तत्पूर्वी लातूर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरेखा व त्यांच्या परिवाराची विचारपूस केली.
स्वच्छ भारत मिशन...
कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन आहे. त्यात स्वत:चे भान हरवलेल्या अन् कचरा कुंडीसारख्या अस्वच्छ ठिकाणी निपचित पडलेल्या मनोरुग्णांना आधार देण्यासाठी, अशा रुग्णांना स्वच्छ भारत मिशनमध्ये मदत करावी, अशी मागणी आरटीआर फाउंडेशनचे राहुल पाटील यांनी केली आहे.