लातूरात झेडपीचे अधिकारी-कर्मचारी रमले मैदानात; लगावले फोर अन् सिक्सर !
By राजकुमार जोंधळे | Published: February 9, 2024 07:37 PM2024-02-09T19:37:56+5:302024-02-09T19:38:06+5:30
या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॉल-बॅडमिंटन, बॅडमिंटन व मैदानी खेळांचा समावेश असला तरी कर्मचाऱ्यांचा ओढा क्रिकेट खेळाकडे दिसला.
- महेश पाळणे
लातूर : दैनंदिन ऑफिस कामात व्यस्त असणारे जि. प.चे अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी क्रीडा संकुलात जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत रमलेले दिसले. निमित्त होते ते जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे. या स्पर्धेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खेळाचा तर आनंद घेतलाच, यासोबतच क्रिकेट स्पर्धेतील चौकार-षटकारांच्या बरसातीवर संगीताच्या तालावर ठेका धरत नृत्याविष्कारही सादर केला. एकंदरीत, दिवसभर फायलींच्या कामात असणारे हे कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विरंगुळा जपताना दिसले.
जिल्हा क्रीडा संकुलात शुक्रवारपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली. अनेक सांघिक व वैयक्तिक खेळप्रकारात या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. जवळपास हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध खेळांत आपले कौशल्यपणाला लावलेले दिसले. वर्षभर कामाच्या व्यापात असणाऱ्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळाचा मनमुराद आनंद लुटला.
क्रिकेट खेळाकडेच ओढा...
या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॉल-बॅडमिंटन, बॅडमिंटन व मैदानी खेळांचा समावेश असला तरी कर्मचाऱ्यांचा ओढा क्रिकेट खेळाकडे दिसला. आपल्या संघाला चेअरअप करीत काही संघांनी तर छोटा डीजेच मैदानात आणला होता. चौकार, षट्कारांची बरसात होताच संगीताच्या तालावर ठेका धरत या कर्मचाऱ्यांनी आपल्या संघाचे मनोबल वाढविले.
पुंगी वाजवून केली चेअरिंग...
व्हॉलिबॉलसह खो खो, कबड्डीच्या मैदानावरही चेअरिंग दिसून आली. विशेषत: आपल्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर गुण घेतले की, पुंगी वाजवून आपल्या संघाला प्रोत्साहन दिले. यात पुरुषांसह महिला खेळाडू कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
निलंगा राईस व लातुरी वडापावचा आवाज घुमला...
व्हॉलिबॉल सामन्यात पंचायत समिती लातूरविरुद्ध निलंगा हा सामना रंगला होता. यात प्रेक्षकांनी आपल्या संघाचे मनोबल वाढविण्यासाठी इस्ट और वेस्ट.. निलंगा राईस इज द बेस्ट... यासह एकच फाईट.. लातूरचा वडापाव टाईट... अशा घोषणा देत स्पर्धेत उत्साह आणला.
कोरोनानंतर तीन वर्षांनी स्पर्धा...
२०१९-२० वर्षात जि.प.च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्पर्धा झाली होती. त्यानंतर कोरोना आला. त्यामुळे स्पर्धा झाली नाही. त्यानंतर आता तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा होत असल्याने जि.प.च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांत उत्साह होता. विविध स्पर्धेच्या माध्यमातून आपले बळ पणाला लावून खेळण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. एकंदरित, या स्पर्धेत कर्मचाऱ्यांनी सांघिक भावना दाखवत खेळाचा आनंद लुटला.