लगीनसराईत साेने झळाळणार; वर्षभरात तिसऱ्यांदा साेन्याने ओलांडला ६२ हजारांचा दर !
By राजकुमार जोंधळे | Published: November 28, 2023 04:11 PM2023-11-28T16:11:28+5:302023-11-28T16:12:13+5:30
यंदाच्या लग्नसराईत साेन्याचा हाच दर ६५ हजारांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे
लातूर : सध्या इस्रायल-हमासदरम्यान शस्त्रविराम सुरू आहे. परिणामी, साेन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. ५५ हजारांवर घसरण झालेल्या साेन्याने प्रतिताेळा ६३ हजारांवर उसळी मारली आहे. चांदीही चकाकली असून, यंदाच्या लग्नसराईत साेन्याचा हाच दर ६५ हजारांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज लातुरातील काही सराफा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. तुलसी विवाहानंतर लग्नसाेहळ्यांची सध्याला धामधूम सुरू झाली आहे. त्यातच साेन्या-चांदीने भाव खायला सुरुवात केली आहे.
गत चार महिन्यांच्या काळात साेन्याच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. गत वर्षभरात साेन्याने तिसऱ्यांदा प्रतिताेळा ६२ हजारांचा दर ओलांडला आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, साेमवारी आणि मंगळवारी लातुरातील सराफा बाजारात २४ कॅरेट साेने ६२ हजार ३९९ रुपयांवर पाेहोचला आहे. तर तीन टक्के जीएसटीसह हा दर ६४ हजार १६९ रुपयांवर हे पोहचला असून चांदी जीएसटीसह ७७ हजारावर पोहचला आहे. मे महिन्यात पहिल्यांदा साेने ६२ हजारांच्या घरात गेले होते. हा सर्वांत उच्चांकी दर हाेता. त्यानंतर सतत घसरण झाली अन् ती ५५ हजारांवर आली. गत महिनाभरात ५९ ते ६० हजारांवर दर स्थिरावला. मात्र, गत आठवड्यात अचानकपणे साेन्याने उसळी घेतली आहे.
युद्धकाळात दरात घसरण...
इस्रायय-हमासदरम्यान सध्या शस्त्रविराम आहे. यातूनच साेन्या-चांदीच्या बाजारात माेठी उलाढाल सुरू झाली. युद्धादरम्यान हेच दर माेठ्या प्रमाणावर घसरले. युद्धाचा परिणाम झाला, सध्या युद्ध थांबल्याने पुन्हा साेन्या-चांदीच्या उलाढालीत वाढ झाली. शुक्रवारपासून सुरू झालेल्या शस्त्रविरामाचा कालावधी वाढविण्याची मागणी वाढत आहे. शस्त्रविराम कालावधी वाढला नाही तर दरात चढ-उतार हाेईल.
इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम..?
साेन्याच्या दरात यंदा माेठ्या प्रमाणावर चढ-उतार हाेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाेणाऱ्या घडामाेडी आणि इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम साेन्या-चांदीच्या उलाढालीवर, दरावर झाला आहे. यंदाच्या लगीनसराईत साेने प्रतिताेळा ६५ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
खरेदीला प्राधान्य...
साेन्या-चांदीचे दर वधारत असल्याने अनेकांनी आतापासूनच साेन्याच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. दिवसागणिक ५०० ते ८०० रुपयांची वाढ हाेत आहे. सध्याला प्रतिताेळ्याचा दर ६३ ते ६४ हजारांच्या घरात आहे.
- सचिन शेंडे-पाटील, सराफा
दरात चढ-उतार...
गत सहा महिन्यांपासून साेन्या-चांदीच्या दरात कायम चढ-उतार हाेत आहे. गत आठवड्यापासून अचानकपणे साेन्या-चांदीचे दर वाढले. परिणामी, अनेकांनी गुंतवणूक म्हणून खरेदीला गर्दी केली आहे.
- महेश शिंदे, बाकलीकर, सराफा