पहिल्याच सभेत विकास कामांवरून ग्रामसेवकास धक्काबुक्की; पोलीस पाटीलासही मारहाण
By संदीप शिंदे | Published: January 27, 2023 05:28 PM2023-01-27T17:28:31+5:302023-01-27T17:29:32+5:30
नागलगाव येथील घटना : तिघांविरुद्ध उदगीर ग्रामीणमध्ये गुन्हा
उदगीर : तालुक्यातील नागलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवीन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिली ग्रामसभा प्रजासत्ताक दिनी सुरू होताच मागील काळातील कामावरून वाद घालत गावातील तिघांनी ग्रामसेवकास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी घडली. यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या पोलीस पाटील यांनाही मारहाण झाली असून, याप्रकरणी ग्रामसेवकांनी दिलेल्या तक्रारीवरुन उदगीर ग्रामीण पोलीसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, नागलगाव येथे नुतन सरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वज फडकल्यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा सुरू झाल्यानंतर गावात मागील कालावधीत झालेल्या कामाबाबत ग्रामसेवकास विठ्ठल रानबा केवढे, अंगद उद्धव कांबळे, भीम पांडुरंग भाटकुळे रा. नागलगाव यांनी विचारणा करीत अडीच वर्षापासून आमच्या गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून ड्युटीला आहेस तू काय केलास? म्हणून शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की केली. भांडण सोडविण्यासाठी पोलीस पाटील वाघे आले असता त्यांनाही धक्काबुक्की करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानुसार लोकसेवक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादीच्या ताब्यातील प्रोसीडींग बुक हिसकावून घेत ग्रामसभा बंद पाडली अशी तक्रार ग्रामसेवक जयवंत शंकरराव कोनाळे यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.