ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील भेसळयुक्त अवैध दारुसाठा जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: December 17, 2022 06:17 PM2022-12-17T18:17:10+5:302022-12-17T18:18:05+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर, उदगीर, औशात धाडी...
लातूर : जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणूक काळात परराज्यातून चाेरट्या मार्गाने आणण्यात येणाऱ्या दारुसाठ्याच्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लातूर, उदगीर आणि औसा तालुक्यात धाडी मारण्यात आल्या. दरम्यान, यावेळी लाखाे रुपयांचा भेसळयुक्त अवैध दारुससाठा पथकाने जप्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या धाडीत औसा तालुक्यातील देवताळा येथे १६ डिसेंबरराेजी गाेवा राज्य निर्मित दारुसाठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने देवताळा येथे छापा मारला. यावेळी गाेवा राज्य निर्मित विदेशी दारुचे ३० बाॅक्स (किंमत २ लाख ३१ हजार ८४० रुपये) जप्त करण्यात आला असून, आराेपी फरार झाले आहेत. त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत उदगीर-नळेगाव राेडवरील डिग्रस-डिगाेळ शिवार (ता. उदगीर) येथे मानवी सेवनाला अपायकारक बनावट, भेसळयुक्त दारु, कर्नाटक राज्यात विक्रीसाठी असलेली दारुची वाहतूक हाेत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डिग्रस शिवारात पथकाने सापळा लावला. यावेळी दाेघांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील दाेन माेटारसायकल, तसेच आराेपींच्या घरातून बनावट विदेशी दारुच्या बाटल्या, प्लॅस्टिक बुचे, रिकाम्या बाटल्या असा एकूण १ लाख ९३ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिसऱ्या घटनेत उदगीर परिसरातील अवैध देशी दारु, हातभट्टी दारु (किंमत १० हजार ८७० रुपये) जप्त केली. या दाेन्ही कारवाईत एकूण २ लाख ४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राउत, निरीक्षक आर.एम. बांगर, आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक ए.के. शिंदे, एल.बी. माटेकर, स्वप्निल काळे, अ.ब. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक ए.एल. कारभारी, गणेश गाेले, अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संताेष केंद्रे, सुरेश काळे, ज्याेतीराम पवार यांच्या पथकाने केली.