तीन तासांत मांजरा प्रकल्पात अडीच टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 08:16 PM2024-08-19T20:16:20+5:302024-08-19T20:16:36+5:30

मांजराच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात अतिवृष्टी

In three hours, the water storage in Manjra project increased by two and a half percent | तीन तासांत मांजरा प्रकल्पात अडीच टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

तीन तासांत मांजरा प्रकल्पात अडीच टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

लातूर : पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने लातूर शहरासाठीच नव्हे तर अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरा प्रकल्पात गेल्या तीन तासांत ११ सेंटिमीटरने पाणी वाढले आहे. मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात शनिवारी सकाळी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता सात टक्के पाणीसाठा होता. त्यात झपाट्याने वाढ होऊन दुपारी तीननंतर ९.२२ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे.

लातूर शहराचा पाणीपुरवठा मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाला तरच लातूरला भरपूर पाणी मिळते अन्यथा टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पावसाकडे लातूरकरांची नजर आहे. धरण कधी भरते याकडे लक्ष लागले आहे. पाटोदा महसूल मंडळात ज्या ठिकाणी मांजरा नदीचा उगम आहे. या तालुक्यातील उगलेवाडी येथून नदीला सुरुवात होते. याच परिसरात शनिवारी सकाळी ७२ मि.मी. पाऊस झाला. या पावसाचे पाणी मांजरा प्रकल्पात यायला तब्बल १२ तास उलटले. तरी धनेगावपासूनवर असलेले महासांगवी आणि संगमेश्वर हे दोन्हीही मध्यम प्रकल्प भरले असल्यामुळे पाणी लवकर आले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात २२.७९ दलघमी नवीन पाणी
मांजरा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत ५९० मि. मी. पाऊस झाला आहे. यामुळे यंदा मांजरा प्रकल्पात २२.७९ दलघमी नव्याने पाणी आले आहे. सध्या प्रकल्पात नव्या आणि जुने पाणी मिळून ६३.४३९ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभापासून पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याचा संचय हळूहळू झालेला आहे. शनिवारी पाटोदा परिसरात अतिवृष्टी झाल्याने एकाच दिवशी अकरा सेंटिमीटरने पाणी वाढले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण भरेल, अशी अपेक्षा आहे.

दिवसभरात रविवारी असे वाढले पाणी
रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून दर तीन तासाला पाण्याची टक्केवारी, पातळी मोजण्यात आली. त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या प्रकल्प क्षेत्रातील पाऊस ओसरला असल्यामुळे दुपारनंतर पाण्याचा येवा कमी झालेला आहे. सोमवारी सकाळी सहावाजेपर्यंत जिवंत पाण्याची टक्केवारी १२ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दर तीन तासाला मोजमाप
सहा वाजता : ७.५ %
बारा वाजता : ८.१३
तीन : ९.२२ %
प्रकल्पातील पाण्याची स्थिती
एकूण पाणीसाठा : ६४.४३९ दलघमी
मृतसाठा : ४७.१३० दलघमी
जिवंत पाणीसाठा :१६.३०९ दलघमी
जिवंत पाण्याची टक्केवारी : ९:२२ टक्के

Web Title: In three hours, the water storage in Manjra project increased by two and a half percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.