अपुऱ्या वीज अटकाव यंत्रणेमुळे दहा वर्षांत ७९ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 06:00 AM2018-06-23T06:00:00+5:302018-06-23T06:00:00+5:30
जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे.
लातूर : जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत केवळ ४ ठिकाणी हे मनोरे उभारण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत वीज पडून ७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदप्तरी आहे.
जिल्ह्यातील बुधोडा, खरोसा (ता. औसा), हेर (ता. उदगीर) आणि वडवळ नागनाथ (ता. चाकूर) या परिसरात गेल्या दहा वर्षांत वीज अटकाव मनोरे उभारण्यात आले आहेत. शासनाकडून पावसाळ्याच्या दिवसात आणि अवेळी पडणाºया पावसात वीज पडून पशुधनांसह मानवी जीवितहानी होते. ती रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची मदत घेऊन वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. २००९ मध्ये प्रथम दोन मनोरे उभारण्यात आले. त्यामध्ये वडवळ नागनाथ आणि बुधोडा येथील मनोºयांचा समावेश आहे, त्यानंतर २०१० मध्ये हेर आणि खरोसा येथील उंच भागावर मनोरे उभारण्यात आले. या अटकाव यंत्रणेची देखभाल संबंधित तहसील कार्यालयाकडे आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक तालुक्यांत दोन मनोरे उभारण्याची गरज आहे. मात्र २०१० नंतर नव्याने एकही मनोरा उभारण्यात आला नाही. २०१५ या वर्षात झालेल्या गारपिटीमुळे १६ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. २००८ ते २०१८ या कालावधीतील २०१५ मध्ये सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
वारसांना आर्थिक मदत
पावसाळ्याच्या दिवसात अथवा अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना २०१५ पर्यंत दीड लाख रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर या मदतीमध्ये २०१५ नंतर अडीच लाखांची वाढ करण्यात आली आहे. २०१५ नंतरच्या मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत ५३ जणांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांप्रमाणे करण्यात आली. तर २०१५ ते २०१८ या कालावधीत २६ जणांच्या कुटुंबियांना १ कोटी ४ लाखांची मदत करण्यात आली.