लातुरात फार्माकॉन - २०२४ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; जगभरातील ७२२ विद्यार्थी, प्राध्यापक, संशाेधकांचा सहभाग
By राजकुमार जोंधळे | Published: February 2, 2024 09:58 PM2024-02-02T21:58:04+5:302024-02-02T21:58:37+5:30
राजकुमार जाेंधळे / लातूर : येथील दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्माकॉन-२०२४ ‘रिसेन्ट ट्रेंड्स इन ड्रग डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट’ ...
राजकुमार जाेंधळे / लातूर : येथील दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्माकॉन-२०२४ ‘रिसेन्ट ट्रेंड्स इन ड्रग डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन एपीटीआयचे अध्यक्ष डॉ. मिलिंद उमेकर यांच्या हस्ते झाले. मंचावर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, सदस्य विशाल लाहोटी, सदस्य सागर मंत्री, प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, डॉ. सी. ई. उमेयोर, डॉ. के. एस. लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते यांनी केले, तर प्रगतीबाबत, नवनवीन राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी म्हणाले, आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच आपण घेतोय, हे विद्यार्थ्यांसाठी, फार्मसी संशोधकांसाठी फलदायी ठरणारी आहे. डॉ. मिलिंद उमेकर म्हणाले, लातूरसारख्या शहरात फार्मसीची आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच महाविद्यालयाच्या वतीने घेतली जात आहे, ही बाब कौतुकाची आहे. विविध सत्रांत डॉ. सी. ई. उमेयोर (नायजेरिया), डॉ. लड्डा के. एस. (आय.सी.टी. मुंबई), डॉ. इरिना पुस्टोलिकिना (कझाकिस्तान) या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधकांनी औषधनिर्माण क्षेत्रातील नवे प्रवाह, औषधांचा शोध आणि त्यांची सुधारणा, जडणघडण, याचे महत्त्व याबद्दल विचार मांडले.
विविध देशातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशाेधकांचा सहभाग...
‘फार्माकॉन-२०२४’ ही परिषद जगभरातील फार्मसी विषयतज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी होती. या परिषदेसाठी देशभरातील महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी विविध राज्यांतून आणि यू.एस.ए., ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, नायजेरिया, कझाकिस्तान आदी परदेशातून फार्मातज्ज्ञ, विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते. या परिषदेत ७२२ हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
परिषदेत २६२ जणांनी सादर केले शाेधनिबंध...
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, सहकारी प्राध्यापकांच्या वतीने निर्मिती करण्यात आलेल्या १० फार्मसी पुस्तकांचे प्रकाशन झाले. परिषदेत २६२ सहभागी स्पर्धकांनी आपले शोधनिबंध, रिसर्च वर्कचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन प्रा. तृप्ती राजमान्य, प्रा. नरेश हलके यांनी केले. आभार परिषदेचे समन्वयक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी मानले.