लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
By संदीप शिंदे | Published: March 12, 2024 03:10 PM2024-03-12T15:10:09+5:302024-03-12T15:10:53+5:30
दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती : रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार
लातूर : रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी व विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी करण्यात आले. यावेळी लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचेही लोकार्पण झाले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवू. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढविणार असल्याचे आश्वासित केले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तर लातूर येथील कार्यक्रमस्थळी खा. सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी आ. सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक संजीवकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, रेल्वेचे मुख्य कारखाना अभियंता सुबोधकुमार सागर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, सोलापूर रेल्वे विभागाचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार यांची उपस्थिती होती.
सर्व रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे: प्रधानमंत्री
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, विकसित भारताच्या दिशेने आपले मार्गक्रमण सुरु आहे. आपण लवकरच जगात विकसित देश म्हणून नावारुपाला येऊ. सध्या विजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली. वंदे भारत रेल्वेची संख्या वाढवून विस्तार केला जाईल. तसेच देशातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील रेल्वे कारखान्यांना यामुळे अधिक काम मिळणार आहे. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कामगार व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच लातूर येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची समोयोचित भाषणे झाली.
मराठवाड्यातील युवकांना रोजगाराच्या संधी : संभाजी पाटील निलंगेकर
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, रेल्वे कोच कारखान्यामुळे मराठवाड्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. हा कारखाना लातूर येथे उभारण्यात यावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गाेयल, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आली होती त्यांनी ही मागणी मंजूर केली. कारखान्याच्या उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. या कारखान्यामुळे इतर उद्योग लातूरला येण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
कारखान्यामुळे लातूरच्या विकासात भर पडली : खा. सुधाकर श्रृंगारे
मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळे लातूरच्या विकासात भर पडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर पोहाेचला आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखाना उभारण्यात आला आहे. या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपात रोजगार निर्मिती होणार आहे.