हेमोफिलिया रुग्णांची गैरसोय; शासकीय महाविद्यालयात डे-केअर सेंटर कधी होणार?
By हणमंत गायकवाड | Published: August 10, 2023 07:48 PM2023-08-10T19:48:26+5:302023-08-10T19:49:29+5:30
लातूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोनशेच्या वर आहे. हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे.
लातूर : जखमेतील रक्त गोठत नसलेल्या अर्थात हेमोफिलिया रुग्णांची राज्यात ५९६२ संख्या आहे. त्यापैकी जिल्ह्यात २०० रुग्ण असून, ५० रुग्णांची नोंद लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे आहे. त्यामुळे येथे हेमोफिलिया डे-केअर सेंटर स्थापन करावे, अशी मागणी होती. ते सेंटर कधी सुरू होणार अन् रुग्णांची गैरसोय कधी थांबणार, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते त्रिंबक स्वामी यांनी उपस्थित केला आहे.
सर्वसामान्य व्यक्तीला जखम झाल्यानंतर काही मिनिटांत रक्तस्त्राव थांबतो. मात्र, हेमोफिलिया रक्तदोषामुळे रक्त गोठत नाही. सारखा रक्तस्त्राव होतो, असे रुग्ण लातूर जिल्ह्यात दोनशे आहेत. त्यापैकी ५० रुग्णांची नोंद शासकीय रुग्णालयाकडे झालेली आहे. अशा रुग्णांच्या उपचारासाठी फॅक्टर ८, फॅक्टर ९, फॅक्टर ७, फॅक्टर एफआयबीए या औषधांची गरज लागते. त्यानुसार ६ मार्चला अधिष्ठातांनी शासनाकडे प्रस्तुत औषधांची मागणी केली होती.
राज्यात ९ ठिकाणीच डे-केअर सेंटर
राज्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा नऊ ठिकाणी हेमोफिलिया रुग्णांची सोय आहे.ती सोय लातूर येथेही उपलब्ध व्हावी आणि रुग्णांची गैरसोय थांबावी, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून शासनाकडे केली जात आहे. स्थानिक प्रशासनही सकारात्मक आहे. मात्र, शासनस्तरावरून याकडे दुर्लक्ष होत आहे.या रुग्णांच्या समस्येची तीव्रता लक्षात घेता डे-केअर सेंटर निर्माण होणे गरजेचे आहे.
हेमोफिलिया आनुवंशिक आजार
हेमोफिलिया हा आजार आनुवंशिक असून, रुग्णांच्या रक्तामध्ये अनेक घटकांची कमतरता असते. त्यांनाच हा आजार होतो. ज्या रक्त घटकांची कमतरता आहे, ते घटक देण्यासाठी डे-केअर सेंटरची गरज आहे.जखम झाल्यानंतर रक्त येणे थांबत नाही, त्यांना हेमोफिलिया असण्याची शक्यता असते.
३६ जिल्ह्यांत डे-केअर करण्याचे आश्वासन...
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही डे-केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात आ. उमाताई खापरे यांनी मागणी केली होती. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये हेमोफिलिया रुग्णांसाठी डे-केअर सेंटर सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, लातूर येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता समीर जोशी यांनीही डे-केअर सेंटरच्या मागणीचा प्रस्ताव पाठविलेला आहे.
डे-केअर सेंटरसाठी शासनाकडे रुग्णांच्या नावासह निवेदन...
काही वर्षांपूर्वी हेमोफिलिया आजार असलेल्या व्यक्तींची संख्या राज्यात ४ हजार ४९८ इतकी होती. मात्र सद्य:स्थितीत ५ हजार ९६२ इतकी झाली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोनशेच्या वर आहे. हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये डे-केअर सेंटर स्थापन व्हावे आणि हेमोफिलियाच्या रुग्णांना लातुरातच उपचार मिळावेत, अशी मागणी आहे. या मागणीची दखल राज्य शासनाकडून घ्यावी, यासाठी निवेदनेही दिली आहेत.