तेलाच्या मागणीत वाढ; खरिपात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा तर रबीत तेलबियांमध्ये घट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:54+5:302021-01-08T05:00:54+5:30
मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन ४ लाख ५९ हजार ९७६ हेक्टरवर पेरणी झाली होती. आता रबी हंगामात सूर्यफुल २३९, ...
मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन ४ लाख ५९ हजार ९७६ हेक्टरवर पेरणी झाली होती. आता रबी हंगामात सूर्यफुल २३९, जवस २२८, करडई ६ हजार ११८ तर इतर गळित धान्याचे ५७९ हेक्टर्सवर क्षेत्र वाढले आहे. कृषी विभाग आणि आत्माच्या वतीने तेलबियांच्या उत्पादन वाढीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. २०१९ या वर्षात जिल्ह्यात ४ लाख ८ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. तर ३६२ हेक्टरवर सूर्यफुल, जवस २६१, करडई ६ हजार ४९८, तर इतर गळित धान्याची ३५६ हेक्टरवर लागवड होती. परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने जलस्त्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रबी हंगामात सर्वाधिक हरभऱ्याला शेतकऱ्यांची पसंती आहे. जिल्ह्यात जवळपास २ लाख २७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. सध्या तेलाची मागणी वाढली असल्याने सोयाबीनचा दरही ४ हजार ३७० वर पोहोचला आहे. तर इतर तेलबियांचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाने आत्माच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.
कृषी विभागाच्या वतीने तेलबियांच्या उत्पादनासाठी विशेष उपक्रम राबविले जात आहे. त्याअंतर्गत हरंगुळ (खु.) येथे ४ एकर क्षेत्रावर करडईचे उत्पादन घेतले आहे. वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने पीकही जोमात आहे. जवळपास ४ एकरवर पेरा असल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. सध्या पीक बोंडअवस्थेत आहे.
- ओमप्रकाश गावकरे,
हरंगुळ खु. येथील शेतकरी
खरीप आणि रबी हंगामातील पीक परिस्थितीबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होते. त्यानुसार २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये सोयाबीनच्या पिकात मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने ४४० हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तेलबियांच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
- दत्तात्रय गावसाने,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, लातूर