रासायनिक खतांच्या दरात वाढ, आर्थिक अडचणींमुळे बळीराजा हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:34+5:302021-05-18T04:20:34+5:30
अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, ...
अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, खतांची खरेदी करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे विशेषत: खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. दरम्यान, पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत बियाणांच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची एक बॅग १ हजार ७०० ते १ हजार ९५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा त्यात चांगलीच वाढ झाली आहे. उडीद, मूग बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात सरासरी ६०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे.
खताचे नाव पूर्वीचे दर सध्याचे दर
१०-२६-२६ ११७५ १७७५
१२-३२-१६ ११९० १८००
२०-२०-० ९७५ १३५०
डीएपी १२०० १९००
पोटॅश ८५० १०००
सुपर फॉस्फेट ४०० ५००
केंद्र सरकारने किमती कमी कराव्यात...
कोरोनामुळे शेतीमाल विक्रीची व्यवस्था कोलमडली आहे. त्यातच रासायनिक खतांची दरवाढ झाली आहे. युरिया वगळता सर्वच खतांमध्ये ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. खत विक्रेत्यांचा नफाही कमी होणार आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी करून बळीराजाला दिलासा द्यावा.
- शिवाजीराव पाटील, कृषी सेवा केंद्र चालक.
शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत त्यांचे उत्पन्न कमी आहे. खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकरी आणखी कर्जबाजारी होतील. उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. केंद्र सरकारने खतांचे भाव कमी करावेत.
- विश्वनाथ हेंगणे,
प्रगतिशील शेतकरी, हडोळती.
गेल्या वर्षी अति पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. यावर्षी सोयाबीन बियाणे दरात वाढ झाली.
दरवर्षी उद्भवणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. आता बियाणे, खतांच्या दरात वाढ झाल्याने नवे संकट आले आहे. शासनाकडून मदतीची गरज आहे.
- संतोष कदम, प्रगतिशील शेतकरी,
तांबट सांगवी.