मासिक मानधनात तात्काळ वाढ करा; जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा
By हरी मोकाशे | Published: December 7, 2023 04:22 PM2023-12-07T16:22:23+5:302023-12-07T16:23:07+5:30
हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडकला.
लातूर : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना मासिक २६ हजार तर मदतनीसांना मासिक २० हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ देण्यात यावा. महागाई निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी. महानगरपालिका हद्दीतील जागेचे निकष शिथील करुन अंगणवाड्यासाठी ५ हजार ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करावे. सर्वसाधारण बालकांसाठी आहाराचा दर १६ तर अतिकुपोषित बालकांसाठी आहाराचा दर २४ रुपये करावा. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे इंधन बिल, टीए बिल त्वरित देण्यात यावे. जानेवारी व फेब्रुवारी २०२३ चे एसएनएच्या माध्यमातून पतसंस्थेला द्यावयाची कर्ज हप्त्याची रक्कम किल्लारी, चाकूर, देवणी, मुरुड येथून मिळाली नाही. ती देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनास देण्यात आले.
टाऊन हॉलपासून प्रारंभ...
आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शहरातील टाऊन हॉल येथून मोर्चास प्रारंभ केला. हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडकला. आंदोलनकर्त्या महिलांनी शासनाच्या धाेरणावर संताप व्यक्त करीत घोषणा दिल्या.