चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

By संदीप शिंदे | Published: April 6, 2024 11:27 AM2024-04-06T11:27:37+5:302024-04-06T11:30:02+5:30

औराद बंधाऱ्यात केवळ १० दहा टक्के साठा : नदीकाठच्या गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव

increased anxiety; All dams on Terana got scratched! | चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातून निम्न तेरणा नदी वाहते. या नदीवरील सातपैकी सहा बंधारे कोरडे पडले आहेत. यातच दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून गुरुवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ४३ अंशाची नोंद झाली आहे. परिणामी, बाष्पीभवन वाढले असून, तेरणा व मांजरा नदीवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागातील अनेक गावांनी विंधन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले.

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा, मांजरा दोन्ही नद्यांवरील उच्चस्तरीय बंधारे, कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. याशिवाय या भागातील लघु साठवण तलावही कोरडेठाक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न पडल्याने व लवकरच पाणीसाठा उन्हाळ्याच्या प्रारंभी कोरडाठाक झाल्याने या भागातील अनेक विंधन विहिरी बंद पडल्या असून, या भागात पाणीटंचाईचा सामना एप्रिल महिन्यामध्येच करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

तगरखेडा ग्रामपंचायतीने दोन विंधन विहिरीचा प्रस्ताव अधिग्रहणासाठी निलंगा तहसीलकडे सादर केल्याचे उपसरपंच मदन बिराजदार म्हणाले. याच पद्धतीने तेरणापट्टा भागातील पाणीसाठा यावर्षी लवकर आटल्याने अनेक गावातील विंधन विहिरी बंद पडल्या असून, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवरती मोठ्या प्रमाणात ताण आल्याने गावातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. या भागाला विंधन विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा अशी मागणी अनेक गावातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रशासनाकडे केली जात आहे. सातपैकी औराद शहाजानी उच्चस्तरीय बंधाऱ्यात केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वच बंधारे काेरडेठाक पडले असल्याचे जलसिंचन शाखा अधिकारी दिनेश काेल्हे यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अधिग्रहणाचा आलेला प्रस्ताव त्याच दिवशी मंजूर करीत असून, ग्रामपंचायतीच्या बोर्डावर अधिग्रहण केलेल्या जलस्त्रोताचे ठिकाण दाखविले जात आहे. सध्या २५ गावांनी ४१ प्रस्ताव पाठविले असून, २६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात...
चार वर्षे सातत्याने चांगला पाऊस झाला. यातच गेल्या वर्षीपासून उसाला चांगला दर मिळत असल्याने निलंगा, लातूर, धाराशिव व शेजारील कर्नाटक राज्यातील अनेक साखर कारखाने पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले. त्यामुळे तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी शाश्वत पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र, यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यात परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे.

तापमानाचा पारा ४४ अंशावर...
औराद शहाजानीसह परिसरात तापमानाचा पारा वाढला असून, बुधवारी ४२.५ अंशांवर असलेले तापमान गुरुवारी ४३ तर शुक्रवारी ४४ अंशांवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. दरम्यान, याच वातावरणात हलकेसे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे उकाडा वाढलेला असून पुढील आठवड्यात सीमावर्ती भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी बाजारात शुकशुकाट दिसून येत असून, पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Web Title: increased anxiety; All dams on Terana got scratched!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.