दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

By हरी मोकाशे | Published: April 4, 2024 05:41 PM2024-04-04T17:41:25+5:302024-04-04T17:44:06+5:30

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही.

Inflammation increased, 289 villages in Latur district were affected; long walk for a pot of water! | दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं.से. च्या वर गेेला आहे. परिणामी, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असल्याने पाणीटंचाई चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर नद्याही वाहिल्या नाहीत. परिणामी, जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून उपलब्ध जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावांत टंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ३९० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात...
तालुका - टंचाईग्रस्त गावे

लातूर - ३७
औसा - ४६
निलंगा - ५८
रेणापूर - २७
अहमदपूर - ७०
चाकूर - १७
शिरूर अनं. - ०५
उदगीर - २०
देवणी - १
जळकोट - ८
एकूण - २८९

११९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणी...
जिल्ह्यातील २८९ गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ३९० प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. त्याची पाहणी केली असता त्यातील २७ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी २०१ गावांचे २४५ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ११९ गावांना १३२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

दोन तालुक्यांत अधिग्रहण नाही...
जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील प्रत्येकी पाच व एका गावाने अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले असले तरी अद्यापही मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन तालुक्यात एकही अधिग्रहण करण्यात आले नाही.

सात गावांना ८ टँकरने पाणी...
जिल्ह्यातील १७ गावे आणि एका वाडीस तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यापैकी ७ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यात औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, मोगरगा, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे.

१० गावांना टँकरची प्रतीक्षा...
अहमदपूर तालुक्यातील फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी, निलंगा तालुक्यातील लिंबाळा या गावांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा आहे.

Web Title: Inflammation increased, 289 villages in Latur district were affected; long walk for a pot of water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.