औराद बाजार समितीत नवीन साेयाबीनची आवक, ५३५१ रुपयांचा भाव
By संदीप शिंदे | Published: September 22, 2023 07:04 PM2023-09-22T19:04:46+5:302023-09-22T19:05:02+5:30
बाजारात सोयाबीनची आवक वाढणार...
औराद शहाजानी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी गौरी-लक्ष्मीच्या आगमनाच्या दिवशी ५ क्विंटल नव्या सोयाबीनची आवक झाली. त्याला ५ हजार ३५१ रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला असून, बाजार समितीच्या वतीने सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी पावसाने काही भागात लवकर तर काही भागात उशिरा हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी लवकर तर काही ठिकाणी उशिरा खरिपाच्या पेरण्या झाल्या. दरम्यान, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला तर ऑगस्ट महिन्यात पावसाने माेठा खंड दिला होता. यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, त्यांनी पाणी देऊन पिके जगविली. सध्या हलक्या जमिनीवरील सोयाबीन काढणीस आले असून, काही भागात राशी सुरू झाल्या आहेत.
औराद शहाजानी बाजार समितीने जे शेतकरी नवीन हंगामातील सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येतील त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवारी सोयाबीनची आवक झाली. बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील जामखंडी येथील शेतकरी बाबूराव तिपन्ना म्हेत्रे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीश मरगणे व व्यापारी व्ही.एम. सोमानी उपस्थित होते. नव्या सोयाबीनला ५ हजार ३५१ रुपयांचा सर्वसाधारण भाव देण्यात आला. निर्भर पिचारे यांनी या सोयाबीनची खरेदी केली. दरम्यान, सोयाबीनला या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला असून, याप्रसंगी सुनील कलगणे, घनश्याम राठी, लालू राठी, लक्ष्मण पिचारे, पिंटू देवणे, तडोळगे आप्पा, संजय आगरे, जीवन शिंदे, उत्तम ऐनापुरे, देवाअप्पा देशमुख आदींसह बाजार समितीमधील व्यापारी उपस्थित होते.
बाजारात सोयाबीनची आवक वाढणार...
औराद शहाजानी परिसरात यंदा उशिरा पाऊस झाला. त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. दरम्यान, मध्यंतरी दीड महिना पावसाने उघडीप दिल्याने पिके वाळू लागली होती. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा होती त्यांनी पाणी देऊन पिके जगविली आहेत. गुरुवारी बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक झाली असून, आगामी काळात औराद परिसरातील सोयाबीन विक्रीसाठी येईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. गुरुवारी नव्या हंगामाचे साेयाबीन खरेदीस सुरुवात झाली असून, यामध्ये वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.